Join us  

डॉक्टरच्या घरी मोलकरणीला जाण्या येण्यास सोसायटीची  बंधने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 7:19 PM

कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या घरी मोलकरणीला जाण्या येण्यास सोसायटीची  बंधने; शिवडीतील प्रकार 

खलील गिरकर

मुंबई : कोरोना मध्ये वैद्यकीय सहाय्यता करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा एकीकडे कोरोना वीर,  कोरोना योध्दे म्हणून गौरव होत असताना दुसरीकडे समाजातून त्यांना व्यक्तिगत पातळीवर मात्र सतावण्याचे प्रकार काही बंद होत असल्याचे चित्र दिसत नाही. 

शिवडीतील एका सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या व महापालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्ये डॉक्टर असलेल्या एका महिला सदस्याने कोविड सेंटर मध्ये काम करत असल्याने घरकामासाठी मोलकरीण ठेवली आहे. कोरोना ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यामध्ये पूर्ण दिवस जात असल्याने त्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरलेला नाही. मात्र या मोलकरणीला सोसायटीमध्ये प्रवेश करण्यास सोसायटीमधील काही जण जाणिवपूर्वक विरोध करत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टरसोबत असा प्रकार घडू लागल्याने त्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.  

या मोलकरणीला हातमोजे व सँनिटायझर सहित सर्व आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही त्याला विरोध केला जात होता. याबाबत पोलिस व महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिल्यावर सोसायटीचे पदाधिकारी नरमले व आपला विरोध मागे घेतला. खरे पाहता कोरोनाच्या युध्दात लढणाऱ्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून त्यांमा साथ देण्याची गरज असताना असे प्रकार होत असल्याने संबंधित डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या महिला डॉक्टरला कोविड केअर सेंटर तर्फे सेंटर परिसरात वास्तव्य करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे त्यामुळे घरकाम व कुटुंबियांना जेवण करण्यासाठी मोलकरीण ठेवणे भाग आहे. मात्र तरीही असे प्रकार घडत असल्याबाबत खंत व्यक्त केली जात आहे. एकीकडे सरकार डॉक्टरांवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी सक्ती करत असताना असे प्रकार टाळण्याची जबाबदारी देखील सरकार व प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.  अनेक सोसायट्यांमध्ये तर प्रत्यक्ष डॉक्टरांना देखील प्रवेश करण्यावर प्रतिबंध लावण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस