Join us  

'समाजानं ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा अन् मराठा आरक्षणाचा विषय मिटवावा' 

By महेश गलांडे | Published: December 24, 2020 2:04 PM

ईडब्लूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत प्रविण गायकवाड यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं

ठळक मुद्देईडब्लूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत प्रविण गायकवाड यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं

पुणे : सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक  प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा एसईबीसी वर्गात येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना होईल. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर लगेच त्या अनुषंगाने शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे. तर, मराठा समाजानं ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि विषय मिटवून टाकावा, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय. 

ईडब्लूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत प्रविण गायकवाड यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा लाभ मिळतोय. सगळं खासगीकरण होणार आहे, त्यामुळं सरकारी नोकरीच्या भरवशावर राहू नये. आरक्षणाच्या पलिकडे खूप मोठी स्पर्धा आहे. आता 85 टक्के नोकऱ्या खासगीकरणात आहेत. पहिल्यासारखं आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी सुरक्षित होती, असं आता राहिलेलं नाही, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. तसेच, मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण घ्यावं आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं स्पष्टच शब्दात प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं. पुण्यात आज काही संघटनांनी राज्य सरकारच्या ewsआरक्षणाच्या निर्णयाची प्रत जाळून निषेध केला, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 

मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटनादुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतोय. फडणवीस सरकारने केलेला एसईबीसीचा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता. घटनेच्या चौकटीत असं जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर, २०२० रोजी मराठा आरक्षणाला दिलेला अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेऊन आजचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील विद्यार्थी/उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 

संभाजीराजेंची आक्रमक भूमिका

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यात काहीतरी गडबड होऊ शकते असा संशय संभाजीराजे यांनी व्यक्त केला. 'सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे, असेही संभाराजेंनी म्हटलंय.

टॅग्स :मुंबईमराठाप्रवीण गायकवाडमराठा आरक्षण