कारभारावर समाज कल्याण विभागाची नाराजी
By Admin | Updated: August 2, 2015 03:08 IST2015-08-02T03:08:13+5:302015-08-02T03:08:13+5:30
मुंबई विद्यापीठातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि त्यांचे शुल्क याची माहिती समाज कल्याण विभाग विद्यापीठाकडे गेल्या चार महिन्यांपासून मागत आहे. या माहितीसाठी अधिकारी सतत चकरा

कारभारावर समाज कल्याण विभागाची नाराजी
- तेजस वाघमारे, मुंबई
मुंबई विद्यापीठातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि त्यांचे शुल्क याची माहिती समाज कल्याण विभाग विद्यापीठाकडे गेल्या चार महिन्यांपासून मागत आहे. या माहितीसाठी अधिकारी सतत चकरा मारत असतानाही विद्यापीठाने अद्याप संपूर्ण माहिती समाज कल्याण विभागाला दिली नसल्याने विभागाने विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यापीठाकडून आवश्यक माहिती मिळत नसल्याने यंदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागण्याची भिती व्यक्त होत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ई - स्कॉलरशिप अंतर्गत आॅनलाइन स्कॉलरशिप प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती, शिक्षण आणि परीक्षा शुल्क प्रदान करण्यात येते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात, तर शिक्षण व परीक्षा शुल्क महाविद्यालयात परस्पर जमा करण्यात येते. समाज कल्याण विभागाने गेल्या वर्षी राज्यातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे संगणक प्रणालीवर मॅपिंग केलेले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय ठरविण्यात आलेली शिक्षण आणि परीक्षा शुल्कची रक्कम थेट आॅनलाइन पद्धतीने महाविद्यालयांना देण्याबाबत समाजकल्याण विभाग विचार करत आहे. या योजनेसाठी समाजकल्याण विभागाने राज्यातील विद्यापीठांमध्ये सुरु असलेले अभ्यासक्रम आणि त्यांचे शुल्क याची माहिती जमा केली आहे. समाज कल्याण विभागाने चार महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाकडे पत्र पाठवून अभ्यासक्रम आणि शुल्काची माहिती मागविली होती. पाठपुरावा करुनही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी विद्यापीठाची राहिल, असा इशारा समाजकल्याण विभागाने दिला आहे.
‘विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने माहिती देण्यास वेळ लागत आहे. विद्यापीठामार्फत समाज कल्याण विभागाला काही माहिती दिली आहे. उर्वरित माहिती लवकरच देण्यात येईल,’ असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए.खान यांनी सांगितले.