Join us  

... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:44 PM

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. मात्र, 21 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे आता निश्चित झालं आहे. साताऱ्याच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच, तेथील उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तर, राष्ट्रवादी समर्थकांकडून शरद पवार यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा आग्रह सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचंही समजते. तसेच शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावेही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. मात्र, शरद पवार स्वत: निवडणूक लढवणार असतील, तर मी माघार घेईल, असं उदनयराजेंनी म्हटलं आहे. 

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ते आदरणीय कालपण होते, आजपण आहेत, भविष्यातपण राहतील. आज महाळ आहेत, असे म्हणत पूर्वजांची आठवण उदयनराजेंनी काढली. त्यावेळी, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यांच्यनंतर तेच माझ्यासाठी आहेत. शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच, ते उभारल्यास मी फॉर्म भरणार नाही, असं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. पण, दिल्लीतील बंगला आणि गाडी यासाठी मला मुभा द्यावी, असे म्हणत पवारांचं प्रेम मिळावं ही अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार नसल्याचं स्पष्ट झालंय.  

टॅग्स :उदयनराजे भोसलेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेससातारानिवडणूक