Join us

...तर मुंबई महाराष्ट्राचा भाग का राहिल? मराठी तरुणानं मांडलं वास्तव, व्हिडिओ होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:14 IST

मुंबईबद्दल भविष्यात काय विचार केला जाईल याबद्दल तरुणानं मांडलेला मुद्दा सोशल मीडियात होतोय व्हायरल

मुंबई

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास आज अभिमानाने सांगितला जातो. ज्या मुंबईसाठी अनेकांनी आपल्या जीवाचं रान केलं त्या मुंबईत मराठी माणसाचं कमी होत जाणारं अस्तित्व हा कळीचा मुद्दा राहिला आहे. याच संदर्भात एका तरुणानं केलेलं भाष्य सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुंबईतून मराठी माणूसच जर कमी होत राहिला, तर ही मुंबई महाराष्ट्राची राहिलच कशी? पुढे जाऊन मुंबई ही मराठी माणसाची आणि पर्यायाने महाराष्ट्राची राहिल का? हा विचार करण्याची गरज असल्याचं मत या तरुणानं व्यक्त केलं आहे. जे आता सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होतंय आणि चर्चेचा विषय ठरतंय. 

मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेरील बाजारात स्वायत्त महाराष्ट्र अभियान संस्थेकडून एक आंदोलन करण्यात आलं. ज्यात मराठीच्या मुद्द्यावर अनेक मागण्या आणि जनजागृती संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. यावेळी एका तरुणानं कार्यकर्त्यांशी बातचित करतानाचा हा व्हिडिओ आहे. ज्यात तरुण मुंबईतील घटत्या मराठी टक्क्यावर बोलताना दिसतो. तो म्हणतो, "जो आता तुम्ही मुद्दा मांडला की मुंबई गुजरातचा पार्ट होईल. जर मुंबईतील चर्चगेटपासून ते वांद्रेपर्यंत मराठी टक्काच जर घसरत गेला. तर मग काहीवर्षांनी आपोआप यावरच चर्चा होईल की मुंबईमध्ये मराठी माणूस आहे कुठे? आणि जर मराठी माणूसच नाहीय मग ती मुंबई महाराष्ट्राचा भाग का असावी?"

व्हायरल झालेला व्हिडिओ...

दरम्यान, स्वायत्त महाराष्ट्र अभियानकडून दादर स्थानकाबाहेर मराठीच्या मुद्द्यावरुन नागरिकांची जनजागृती आणि काही मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. ज्यात महाराष्ट्र हे मराठी भाषक समाजाचे राज्य असल्याने व मराठी ही राज्याची घटनात्मक अधिकृत भाषा असल्याने, महाराष्ट्र राज्यात रोजगारासाठी येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकावीच लागेल आणि तिचा वापर व्यवहारात आणि कामकाजात करावाच लागेल, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी बोलणे अनिवार्य करणे, मराठी शाळांचे सक्षमीकरण, मराठी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्यांना रोजगार, स्थलांतरित लोंढ्यांवर निर्बंध अशाही मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं.

टॅग्स :मुंबईमराठी