Join us  

... म्हणून उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला, अमित शहांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 7:16 PM

आपल्या भाषणाची सुरुवातच जय भवानी-जय शिवाजी म्हणून केली.

मुंबई - उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील कराड येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी सभा घेतली. आपल्या भाषणाची सुरुवातच जय भवानी-जय शिवाजी म्हणून केली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी अमित शहा कराडमध्ये आले होते. सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून भगवा झेंडा दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचं काम याच भूमितून झाल्याचं अमित शहांनी म्हटलं.

साताऱ्यातील सभेतही अमित शहांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत, कलम 370 हटविल्याचं सांगितलं. देशात 300 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपाचे बहुमताचे सरकार स्थापन झाले. या सरकारने सत्तेवर येताच देशावासियांची अस्मिता असलेल्या काश्मीर मुद्द्याला हात घातला. भारताचं अतूट अंग असलेल्या काश्मीरमधील कलम 370 हटवून मोदींनी काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं ठणकावून सांगितल्याचं अमित शहांनी म्हटलं. तसेच, कलम 370 हटविल्यामुळेच उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला, असेही अमित शहांनी आपल्या भाषणात सांगितले. 

साताऱ्यातील सभेत अमित शहांनी पुन्हा कलम 370 वरुन शरद पवारांना टार्गेट केलं. साताऱ्यातील नागरिकांना मी विचारू इच्छितो, 370 हटवायला पाहिजे होतं की नाही, असा प्रश्न विचारुन शहांनी पवारांना टार्गेट केलं. तसेच, महाराष्ट्रातील जनतेला याचा आनंदच झाल्याचंही शहा म्हणाले. 

टॅग्स :अमित शहाउदयनराजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराजसाताराकलम 370