Join us  

…तर काहीतरी नक्कीच गडबड आहे, राज्यपाल कोश्यारींचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 6:10 AM

bhagat singh koshyari : विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

नाशिक - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संबंध हे सुरुवातीपासूनच तणावपूर्ण राहिले आहेत. दरम्यान, विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीची धावपटू कविता राऊत हिच्या नोकरीच्या प्रश्नावरून राज्यपालांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकार आणि क्रीडामंत्री सुनील केदार हे नोकरी देऊ शकत नसतील काहीतरी गडबड आहे, असा टोला भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.

राज्यपालांच्या हस्ते नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे लोकार्पण झाले. त्यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टीका केली. आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील. तसेच शिक्षकांची भरती होत नसेल, तर राज्य सरकार काय करतंय, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकारने क्लास वन श्रेणीची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आपल्यानंतरच्या खेळाडूंना राज्य सरकारने चांगल्या पदावांवर नोकरी दिली. मात्र आपल्याला डावलले जात असल्याची खंत कविता राऊत हिने व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणी तिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीमहाराष्ट्र सरकार