Join us  

... म्हणून 'वेल्हा' तालुक्यास राजगड नाव द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:39 AM

तालुक्यातील जनतादेखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय

मुंबई - बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हा तालुक्यास राजगड नाव देण्याची मागणी केली आहे. तसेच, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडेही मी ही मागणी केली होती, असेही त्यांनी म्हटलंय. इतिहासकालीन दाखले देत, छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या राजगड किल्ल्याचा स्वराज्याची पहिली राजधानी असा लौकीक आहे. तो किल्ले राजगड वेल्हा तालुक्यात आहे. येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक काळ कारभार पाहिला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले, जपले व ते प्रत्यक्षात आणले, असे म्हणत या तालुक्याचे नामांतर करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. 

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड हे नाव द्यावे. यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. याबाबत तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेतून आलेल्या या मागणीचा विचार करुन वेल्हे तालुक्यास राजगड हे नाव द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते 1947 सालापर्यंत या तालुक्याचा 'राजगड तालुका' असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने 1939 साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे, असे सुप्रिया यांनी म्हटलंय. 

तालुक्यातील जनतादेखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन वेल्हा तालुक्याचे नाव राजगड करावे ही विनंती. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असेही सुप्रिया यांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसबारामतीराजगढ