Join us  

... म्हणून मी 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देतो, सदावर्तेंचं आझाद मैदानातून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 1:09 PM

एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असं म्हणत खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान सोडलं.

ठळक मुद्देमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे, मी लॉ विषयात डॉक्टरेट आहे. मी साहित्याचा अभ्यासक आहे, मी आंबेडकर विचारांचा एम.ए. मधील गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळे मी सर्वांना सांगतो

मुंबई - गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. आहे. त्यानंतर, आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतल्याचं जाहीर करत, आझाद मैदान सोडलं. त्यानंतर, आंदोलक कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचं नेतृत्व करताना पडळकर व खोत यांच्यावर टीका केली आहे.  

एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असं म्हणत खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान सोडलं. त्यानंतर, गुणरत्न सदावर्ते यांनी भाषण करत, जोपर्यंत विलीगीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा पवित्रा जाहीर केला. राज्यातील 250 बस डेपोमधील कामगारांचे यास समर्थन असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, पडळकर आणि खोत यांच्यावर टीका करताना, माझ्याकडे सदाभाऊ खोत हे माझ्या पाया पडल्याचा व्हिडिओ आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, आपण मराठा आरक्षणाविरुद्ध कोर्टात खटला लढवला, बाजू मांडली. मग, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा का देता? असा प्रश्न सदावर्ते यांना विचारण्यात आला होता. त्यावरही, गुणरत्न यांनी स्पष्टीकरण दिलंय.   

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे, मी लॉ विषयात डॉक्टरेट आहे. मी साहित्याचा अभ्यासक आहे, मी आंबेडकर विचारांचा एम.ए. मधील गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की, एक मराठा लाख मराठा ही शक्ती देणारी घोषणा आहे, ही एकीकरण देणारी घोषणा आहे. ही एखाद्या जीतसंबंधांतून नसून भाषेआधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, भीमसैनिक हे एकत्रित येऊन ही उभी केलेल्या चळवळीसाठीची घोषणा आहे, हा जोश आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी एक मराठा लाख मराठा या घोषणेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. इराद नेक हो तो सपने साकार होते है, सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते है, असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली.  

सदाभाऊ अन् पडळकरांची माघार

एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. मात्र एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. आंदोलनाला पहिल्या टप्प्यात मिळालेलं यश मोठे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :मुंबईएसटी संपसदाभाउ खोत गोपीचंद पडळकर