Join us  

... तर मी ब्राह्मण समाजातील बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो, खडसेंचा यु टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 2:07 PM

ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. ''दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला.

ठळक मुद्देब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. ''दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेंनी मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे. आता, एकनाथ खडसेंनी ट्विट करुन माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय. तसेच, दिलगिरीही व्यक्त केली आहे. 

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असंही दवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे एकनाथ खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटतं, एकनाथ खडसेंनी आपलं विधान मागे घ्यावं नाहीतर पुण्यात आल्यानंतर खडसेंना जाब विचारण्यात येईल. यासंदर्भात आनंद दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिलं आहे. 

ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. ''दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच  पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'', असे खडसेंनी म्हटलंय.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला असं एकनाथ खडसे म्हणाले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही वर्षांपासून भाजपामध्ये नाराज होते. मंत्रिपद काढून घेतल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली होती. दरम्यान, या नाराजीची पक्षाने दखल न घेतल्याने अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केल्यापासून एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे टीका करत आहेत. मी संपूर्ण जीवन पक्षासाठी खर्च केलं. एकनिष्ठ राहीलो. मात्र मला एका माणसानं छळलं, असा आरोपही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

टॅग्स :एकनाथ खडसेदेवेंद्र फडणवीसभाजपाब्राह्मण महासंघ