Join us  

...तर विनापरवानगी यूपीच्या मजुरांनाही प्रवेश नाही; राज ठाकरे यांचे आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:05 AM

मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी धोरण आखण्याचे संकेत देतानाच यापुढे कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे.

मुंबई : लॉकडाउनच्या काळात मजुरांना मिळालेल्या वागणुकीचा मुद्दा पुढे करत उत्तर प्रदेश सरकारने यासाठी धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे. यापुढे अन्य राज्यांना परवानगीशिवाय मजुरांची सेवा घेता येणार नाही, अशी भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली. यावर, मग आता इकडे यायचे असेल तर आमची परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी धोरण आखण्याचे संकेत देतानाच यापुढे कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकारला थेट इशारा दिला. जर तसे असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. महाराष्ट्र सरकारलाही राज यांनी धोरणात सुधारणा करण्याची सूचना केली.

संजय राऊत यांचा भाजपला टोला

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचलेत का, त्यांची अन्नपाण्याची व्यवस्था झाली का, याची योगींनी आधी काळजी घ्यावी. लॉकडाउनच्या काळात मजुरांची जी चांगली व्यवस्था केली, त्याचे व्हिडीओ आम्ही पाठवू शकतो. महाराष्ट्रात या मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना आवडले नसेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

टॅग्स :राज ठाकरेयोगी आदित्यनाथमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस