Join us  

...म्हणून परप्रांतीय उद्योजक आले; राज ठाकरे यांची टोलेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 5:27 AM

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने हॉटेल ताज येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : महाराष्ट्रातील सुसंस्कृत मराठी माणसाने महाराष्ट्रात पोषक वातावरण तयार केले. त्यामुळेच गुजराती आणि मारवाडी लोक इथे येऊन उद्योगधंदा, व्यवसाय करू शकले. त्यांनी त्यांच्या राज्यात उद्योगधंदे उभारले नाहीत, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ‘मी उद्योजक होणार’ या कार्यक्रमात काढले.

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने हॉटेल ताज येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज ठाकरे यांच्यासह वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, शिवसेना नेते मनोहर जोशी आदी नेते उपस्थित होते. या वेळी ठाकरे आणि जोशी यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. मराठी उद्योजकांनी कोणत्याही मर्यादेत स्वत:ला अडकवू नये. हॉटेल बांधायचे असेल तर ताज उभारावे असे सांगतानाच मनोहर जोशी यांनी ताज का नाही उभारला असा टोला लगावला. ठाकरे यांच्या भाषणापूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना जोशी यांनी आपण शिक्षक असल्याने ४०-५० मिनिटे होईपर्यंत भाषण संपविणार नाही, असे म्हटले होते. हाच धागा पकडत मी शिक्षक नसल्याने पाच-दहा मिनिटात भाषण संपवेन, असा चिमटा राज यांनी काढला. मराठी माणूस मागे आहे, हा भ्रम डोक्यातून काढून टाका. सर्वच मारवाडी, गुजराती माणसांनी दुकाने टाकलेली नाहीत. महाराष्ट्रातही मोठे उद्योजक आहेत. मराठी लोकांनी आणि महाराष्ट्राने पोषक वातावरण तयार केले म्हणून मारवाडमधील लोक व्यवसायासाठी महाराष्ट्रात आले, असे राज म्हणाले.

पुस्तके वाचून उद्योजक होता येत नाही. त्यामुळे ‘उद्योजक व्हा’ वगैरेसारखी पुस्तके वाचू नका. त्यांना हातही लावू नका. त्याऐवजी मनोहर जोशी, सुरेश हावरे आदींच्या जीवनावरील पुस्तके वाचा, असेही राज म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमनसे