सापांच्या रक्षणासाठी सर्प मित्रांची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2015 22:29 IST2015-06-04T22:29:50+5:302015-06-04T22:29:50+5:30
पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. मात्र आजघडीला कुणाकडून हा समतोल राखला जातो हा मोठा प्रश्न आहे.

सापांच्या रक्षणासाठी सर्प मित्रांची धाव
माथेरान : पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. मात्र आजघडीला कुणाकडून हा समतोल राखला जातो हा मोठा प्रश्न आहे. निसर्गाचे संकट आज आपल्या पुढे उभे ठाकले आहे. या संकटावर मात करण्यासाठी मानवाला निसर्गाशी समतोल ठेवावाच लागणार आहे. यासाठी आज काही पर्यावरणप्रेमी, संघटना सरसावल्या आहेत. सापांचे संरक्षण करण्यासाठी ‘निसर्ग - गिरीभ्रमण’ या संस्थेने ‘सर्प बचाव’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
रोह्यातील ‘निसर्ग - गिरीभ्रमण’या संस्थेचे दहा ते बारा सर्पमित्र गेली पंधरा ते सतरा वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून आतापर्यंत हजारो सापांना जीवदान देऊन त्यांना सुखरूप जंगलात सोडण्यात आले आहे. तसेच हे सर्पमित्र या सापांचा अभ्यास करत आहेत. चंद्रशेखर सप्रे व नागेश शिंदे हे साप पकडण्यासाठी गेले असताना अष्टमी येथील सुर्वे यांच्या घरी मादी दिवड व तिची ३३ अंडी त्यांना मिळाली. ही अंडी सप्रे आणि कुणाल साळुंके यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अंडी ठरावीक पध्दतीने जोपासून त्यांना उबण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण करुन दिली. ती अंडी उबवण्यात त्यांना यश आले असून आश्चर्य म्हणजे त्यातून २७ पिल्ले जन्माला आली आहेत. ही पिल्ले त्यांना हवे असलेले पोषक वातावरणात अत्यंत काळजीपूर्वक व सुखरूपपणे सोडण्यात आली.
हे सर्व करत असताना लोकांचे व वनविभागाचे सहकार्य मिळाले. वरील सर्व खटाटोप पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी केला गेला असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. (वार्ताहर)
सापांबाबात गैरसमज : जगभरात सापाच्या २५०० ते ३००० जाती आहेत. यातील काही साप हे १० सेंटीमीटरचे असतात तर अजगर हा साप २५ फूट लांब असतो. साप हा शीतरक्ताचा प्राणी असून स्वत:च्या शरीराचे तापमान तो स्वत: राखू शकत नाही. सापांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. कोणताही साप विषारी समजून लोक त्याला जीवे मारतात, हीच लोकांची वृत्ती निसर्गालाही घातक ठरत आहे. आज जंगले नष्ट करून सिमेंटचे जंगल उभारले असल्याने याचा परिणाम इतर प्राण्यांप्रमाणे सापांवरही झाला आहे.