तस्कर आरिफ भुजवालाचे धागेदोरे दुबईपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:52+5:302021-02-05T04:29:52+5:30
अंडरवर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन; ३० जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महानगर व परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीचा ...

तस्कर आरिफ भुजवालाचे धागेदोरे दुबईपर्यंत
अंडरवर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन; ३० जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानगर व परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीचा अंडरवर्ल्डमधील मुख्य सूत्रधार व डी गँगचा हस्तक आरिफ भुजवाला याचा दुबईतील गँगस्टर सोबतच्या संबंधांचा छडा लावला जात आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि राजपूत हे तस्करीचा व्यवसाय सांभाळत असल्याने भुजवाला त्यांच्या नित्य संपर्कात असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. दरम्यान, भुजवालाला मंगळवारी ३० जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.
अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) डोंगरीतील नूर मंझिल येथील अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून दोन कोटींच्या रोकडसह अनेक किलो ड्रग्ज व ते तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक द्रव्याचा साठा जप्त केला होता. त्यावेळी फरार झालेल्या भुजवालाला सोमवारी एनसीबीच्या पथकाने रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्याच्यावरील कारवाईमुळे दुबईतून आयात होत असलेल्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
डी गँगकडून मुंबईसह देशभरात ड्रग्जचा पुरवठा करण्यात येतो. भुजवाला हा यातील महत्त्वाचा सूत्रधार असल्याने त्याची कसून चाैकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचा सहकारी व गँगस्टर करीम लाला याचा नातेवाईक चिकू पठाणच्या अटकेनंतर अंडरवर्ल्डचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले.
................................