Join us  

बॉलिवूडच्या वातावरणात सुखावह बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:16 AM

तनुश्री दत्ता हिच्या आरोपानंतर भारतात बळ मिळालेल्या मीटू मोहिमेमुळे मोठे वादळ निर्माण झाले होते.

मुंबई : तनुश्री दत्ता हिच्या आरोपानंतर भारतात बळ मिळालेल्या मीटू मोहिमेमुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक महिलांनी पुढे येत ‘मीटू’ प्रकरणांना वाचा फोडली होती. पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलाही आपल्या अन्यायावर बोलत्या झाल्या. सोशल मीडियातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे वाढत गेली. अनेकांना पदे सोडावी लागली, तर काही जणांवर त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात कारवाईही झाली. या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनी ‘मीटू’ मोहिमेनंतर ‘ती’चे विश्व कसे बदलले आहे, याचा घेतला. २०१८ सालात बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे आले खरे; पण सर्वांत जास्त चर्चा झाली ती ‘मीटू’ वादळाची. या वादळाची झळ बॉलिवूडमधील बड्या बड्या असामींनाही बसली. आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात बॉलिवूडच्या नायिकांनी, मॉडेल्सनी, लेखिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. सध्या ‘मीटू’चे वादळ शांत झाले असले तरी त्याच्या तडाख्यानंतर बॉलिवूडमधील वातावरण पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे.‘मीटू’चे वादळ बॉलिवूडमध्ये सर्वांत पहिले आणले अभिनेत्री तनुश्री दत्ताने. १० वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार तिने पोलिसांकडे नोंदविली आणि हे वादळ बॉलिवूडमध्ये घोंघावू लागले. आलोकनाथ, साजिद खान, राजकुमार हिरानी, अन्नु मलिक या दिग्गजांनाही या ‘मीटू’चा तडाखा बसला. ‘मीटू’ मोहिमेनंतर चित्रपट उद्योगातील लोक घाबरले आहेत. ‘मीटू’चे वादळ प्रभावी ठरले आहे. पूर्वी चित्रपट उद्योगातील लोक घाबरत नव्हते; मात्र आता ते बोलण्यासही घाबरतात. मीटू आंदोलनामुळे चित्रपट जगतात काहीतरी चांगले घडले आहे. महिलांशी बोलताना त्यांना जी भीती वाटते ती वाटणे गरजेची आहे. महिलांना सन्मान मिळत आहे; मात्र ही भीती कायम राहिली पाहिजे, असे या चित्रपटसृष्टीत कित्येक वर्षे काम करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे.‘मीटू’च्या वादळामुळे महिलांचा सन्मान जरी वाढला असला तरी दुसरीकडे ज्यांच्यावर नाहक आरोप झाले आहेत त्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्याही चित्रपटसृष्टीत कमी नाही. अजूनपर्यंत ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांच्या कोणावरचेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. आरोप झाल्यामुळे त्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे. सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (सिंटा) काही कलाकारांवर या आरोपांमुळे बंदी घातली आहे.मात्र न्यायालयात ‘मीटू’मध्ये आरोप झालेल्या कलाकारांवर आरोप सिद्ध झाले नसतील तर त्यांच्यावर अशी बंदी घालून त्यांचे करिअर संपविणे कितपत योग्य आहे, असा सूर चित्रपटसृष्टीत आहे. मात्र ‘मीटू’च्या वादळामुळे चित्रपटसृष्टीत महिलांबाबत सन्मानाची भावना मात्र निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर होणाºया बदनामीमुळे असे प्रकार होणे जवळपास बंद झाले आहे इतके मात्र नक्की.>मराठी सिनेसृष्टीत ‘मीटू’चे वादळ आतापर्यंत तरी आलेले नाही. दबक्या आवाजात जरी याची चर्चा सुरू असली तरी कोणीही समोर येऊन याची चर्चा केल्याचे एकही उदाहरण समोर आलेले नाही. मात्र मीटूच्या वादळाने चित्रपट, मालिकांच्या सेटवर आणि नवनवीन स्ट्रगलर्सना ब्रेक देणाºया मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या आॅफिसमध्ये एक प्रकारची भीती नक्कीच निर्माण झाली आहे. महिलांचा सन्मान राखला नाही, तर भयंकर विरोधाला आणि बदनामीला सामोरे जावे लागेल आणि इतक्या वर्षांत चित्रपटसृष्टीत कमावलेले नाव क्षणार्धात धुळीस मिळेल या भीतीने सेटवरील वातावरणातही एक आश्वासक बदल पाहायला मिळत आहे, ही नक्कीच महिलांसाठी सुखावणारी बाब आहे.

 

टॅग्स :तनुश्री दत्ताजागतिक महिला दिनमहिला