व्हॅलेंटाइन डे ची धूम

By Admin | Updated: February 14, 2015 22:37 IST2015-02-14T22:37:05+5:302015-02-14T22:37:05+5:30

ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात म्हणजेच ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण आदींसह इतर ठिकाणी शनिवारी व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे.

Smoke of Valentine's Day | व्हॅलेंटाइन डे ची धूम

व्हॅलेंटाइन डे ची धूम

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात म्हणजेच ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण आदींसह इतर ठिकाणी शनिवारी व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे. काहींनी हा दिवस संस्कृती दिन म्हणून साजरा केला तर काही ठिकाणी हॉटेलवाल्यांसह केक शॉप, जिम आदींनी या दिवसाच्या निमित्ताने विविध स्कीम कपलसाठी देऊ केल्या होत्या. ठाण्यातील मासुंदा तलाव हा सकाळपासूनच काहीसा फुलून गेला होता.
सर्वत्र गुलाबपुष्प, मोबाइलवरील एसएमएस व्हॉट्सअ‍ॅपवर प्रेमगीतांतील संदेश, शुभेच्छापत्रे यांचाही मुक्त वापर करण्यात आला. गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेनेने या दिवसाला विरोध केला होता. परंतु आता त्यांचा विरोध मावळल्याने आता हा दिवस ठाण्यासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणीही साजरा केला जात आहे. तरुण-तरुणींचे एकमेकांना प्रपोज करणे, त्यांच्यासाठी गिफ्ट देणे, गुलाब देणे आदींचा यात समावेश असतो. ठाण्यातदेखील आता हा दिन साजरा झाला.
(प्रतिनिधी)
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा दिन संकृती दिवस म्हणून साजरा केला गेला. शनिवारी ज्येष्ठ नागरिक आणि गतिमंद मुलांसमवेत त्यांनी येथील सिद्धांचल उद्यानात हा दिवस साजरा केला. प्रेम फक्त आपल्या जोडीदारावर न करता आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, वृक्ष, प्राणी, निसर्गावरही करता येते. परंतु या दिवसाचे महत्त्व लक्षात न घेता तरु ण-तरु णी मात्र परदेशी संस्कृती आत्मसात करीत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे हा दिवस तरु ण-तरु णीपर्यंत मर्यादित न ठेवता प्रेम सर्वांवर करावे, असा संदेश देण्याकरिता या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आल्याचे कार्यक्र माचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.
एसएमएस व्हॉटसअ‍ॅपवर प्रेमगीतांतील संदेश
केवळ महाविद्यालय परिसरातच नव्हेतर निरनिराळी कार्यालये, सोसायट्या व संस्थातही निरनिराळ्या कार्यक्रमांनी व्हॅलेंटाइन डे साजरा करून मित्रांनी एकमेकांकडे आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. एकमेकांना गुलाबपुष्प भेट दिले. मोबाइलवरील एसएमएस व्हॉटसअ‍ॅपवर प्रेमगीतांतील संदेश, शुभेच्छा यांचाही मुक्त वापर करण्यात आला. वृद्ध जोडप्यांचा गौरव, सोसायट्यातून प्रेमाचा संदेश देणारे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन हे आजच्या व्हॅलेंटाइन डे चे वैशिष्ट्य व आकर्षण होते.

गुलाब, पुष्पगुच्छांचे
भाव भिडले गगनाला
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलमार्केटमध्ये पुणे, नगर, मुरबाड भागातून गुलाबाच्या फुलांची मोठी आवक झाली. येथून ही फुले किरकोळ विक्रीसाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जतपर्यंत किरकोळ विक्रीसाठी पाठविण्यात आली. शनिवारी सकाळी ७ पासूनच हातगाडीवर गुलाबाची फुले विक्रीसाठी होती. चांगल्या उमललेल्या फुलांची किंमत १५ ते २० रू. होती. ५ ते ७ लाल, पिंगट गुलाबी फुलांच्या सजवलेल्या पुष्पगुच्छाची किंमत १५० ते २०० पर्यंत होती.

भेटवस्तूंसह,
सहभोजनाचा आनंद
भेटवस्तूमध्ये टेडी, चांगले पेन, शुभेच्छा कार्ड, अंगठी, पैंजण, चॉकलेट यांचा प्रामुख्याने समावेश होता. महाविद्यालयातील तरुण -तरुणांनी मित्रांसह उच्च हॉटेलात जाऊन सहभोजनाचाही आनंद लुटला. त्या हॉटेलातूनही प्रेमगीतांची धूम वाजवून वातावरणनिर्मिती केली होती. हृदयाच्या आकाराच्या थर्माकोलच्या चांगल्या पेंटिंग केलेल्या व प्रेमाचे संदेश देणाऱ्या कलाकृती झपाट्याने १५० ते २०० रुपयांपर्यंत
होत्या.

जोडप्यांचा गौरव; बँकेतही ग्राहकांचे स्वागत
नव्याने विकसित झालेले श्री कॉम्प्लेक्स, गोदरेज हिल, कोकण वसाहत परिसर, महाविद्यालये येथे प्रेमगीतातून प्रेमभावना व्यक्त करणारे काव्य गायन, काव्य स्पर्धा, ज्यांच्या विवाहाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा जोडप्यांचा सुखी जोडपे म्हणून गौरव करण्यात येऊन त्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम, आंतरधर्मीय, आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांचे अनुभवकथन व त्याहीपेक्षा समाजाविषयी त्यांच्या भावना व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. बँकांतून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बँकेत येणाऱ्या ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन बँकेवर आपले असेच प्रेम राहू द्या, अशा भावना व्यक्त केल्या. वंचितांच्या मुलांमध्ये कार्य करणाऱ्या अनुबंध या संस्थेतर्फे कचरा गोळा करणाऱ्या मुलांना शिकवण्याचे वर्ग घेतले जाते. त्या मुलांनी आपल्या शिक्षकांना गुलाबपुष्प भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

Web Title: Smoke of Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.