मुंबईत ‘स्मार्ट सिग्नल’!
By Admin | Updated: November 14, 2015 03:25 IST2015-11-14T03:25:07+5:302015-11-14T03:25:07+5:30
वाहतूककोंडी आणि वाहनांची गर्दी लक्षात घेता महापालिकेने वाहतूक सिग्नल स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतल्या एकूण ५९० ठिकाणी असणाऱ्या सिग्नल्सपैकी

मुंबईत ‘स्मार्ट सिग्नल’!
मुंबई : वाहतूककोंडी आणि वाहनांची गर्दी लक्षात घेता महापालिकेने वाहतूक सिग्नल स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतल्या एकूण ५९० ठिकाणी असणाऱ्या सिग्नल्सपैकी तब्बल २५५ ठिकाणी असणारे सिग्नल्स स्मार्ट करण्यात आले आहेत. रस्त्यावरील गर्दीच्या प्रमाणानुसार या सिग्नल्सचा कालावधी कमी-जास्त होतो, हे या सिग्नल यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. आता उर्वरित सिग्नल स्मार्ट म्हणजे स्वयंचलित व अत्याधुनिक करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
महापालिकेच्या प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) आणि उपप्रमुख अभियंता (वाहतूक) यांच्या अखत्यारीतील कार्यकारी अभियंता (एटीसी) या उपविभागाद्वारे स्मार्ट सिग्नलचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. स्मार्ट सिग्नलच्या सर्व बाजूंनी असणाऱ्या रस्त्यांवर वाहनसंख्या मोजणारे अत्याधुनिक वाहनशोधक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे संबंधित प्रत्येक रस्त्यावरील वाहतुकीच्या ओघाची नोंद संगणकीय पद्धतीने घेण्यात येत आहे. शिवाय ज्या दिशेला अधिक संख्येने वाहने धावत आहेत, त्या दिशेसाठीचा हिरवा सिग्नल अधिक काळ राहण्यासह सिग्नल बदलण्याचा कालावधी वाहनांच्या प्रमाणानुसार स्वयंचलित पद्धतीने बदलत आहे. त्याचबरोबर काही स्मार्ट सिग्नल हे त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीद्वारे प्राप्त चित्रणाच्या आधारे वा प्राप्त संगणकीय माहितीद्वारे मानवीय पद्धतीने नियंत्रित करतात.
एखाद्या वाहतूक सिग्नलमध्ये किंवा वाहनशोधक कॅमेऱ्यामध्ये तांत्रिक समस्या उत्पन्न झाल्यास त्याची माहिती वरळीतील वाहतूक पोलीस मुख्यालय व महापलिकेच्या वरळी येथील अभियांत्रिकी संकुलात संगणकीय प्रणालीद्वारे थेटपणे प्राप्त होते, ज्यामुळे संबंधित बिघाड किंवा तांत्रिक समस्या दूर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येते.