महाराष्ट्रातील छोटी शहरे हवाई मार्गाने जोडणार
By Admin | Updated: September 9, 2014 05:16 IST2014-09-09T05:16:37+5:302014-09-09T05:16:37+5:30
महाराष्ट्र सरकार छोट्या शहरांना हवाई मार्गाद्वारे मोठय़ा शहरांशी जोडण्याच्या योजनेवर काम करीत आहे.

महाराष्ट्रातील छोटी शहरे हवाई मार्गाने जोडणार
मुंबई : महाराष्ट्र सरकार छोट्या शहरांना हवाई मार्गाद्वारे मोठय़ा शहरांशी जोडण्याच्या योजनेवर काम करीत आहे. या योजनेअंतर्गत नागपूर ते चंद्रपूर अशी विमान सेवा सुरू करण्यात येईल.
लोकांना सध्या सडक मार्गाने नागपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. परंतु विमानाने केवळ २५ मिनिटात नागपूरहून चंद्रपूरला जाता येईल. सध्या नागपूर ते चंद्रपूर अशी विमान सेवा उपलब्ध नाही, अशी माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी.एस. मीणा यांनी दिली.
विमान कंपन्यांनी या संदर्भातील प्रस्तावात रुची दाखविलेली आहे आणि या योजनेसाठी ऑपरेटर्सची निवड निविदा जारी करून केली जाणार आहे, असे मीणा यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात २२ विमानतळ आहेत. परंतु मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या बड्या शहरांमधून छोट्या शहरांसाठी कोणताही हवाई संपर्क नाही.
सरकारने छोट्या शहरांसाठी परिचालन करणार्या विमानांमध्ये काही जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
राज्यभरात दौरा करणारे अधिकारी या विमान सेवेचा उपयोग करू शकतील. जर कुणी विमान प्रवास करणार नसेल तरी राज्य सरकार त्यांना विमानाच्या तिकिटाचे पैसे देईल, असे हा अधिकारी म्हणाला.
अशाप्रकारची एक योजना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशत सुरू आहे. सरकार चंद्रपूरच्या विमानतळाच्या विस्तारासाठी पर्यायी जमिनीच्या शोधात आहे. परभणी आणि गडचिरोली या शहरांमध्येही विमानतळ निर्माण करण्याची सरकारची योजना आहे. (प्रतिनिधी)