छोटया ग्राहकांवर विज कडाडणार
By Admin | Updated: May 9, 2014 22:56 IST2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T22:56:21+5:30
बेस्टच्या निवासी व छोट्या ग्राहकांवर दरवाढीचे संकट कोसळणार असल्याचे संकेत प्रशासनाने शुक्रवारी दिले़

छोटया ग्राहकांवर विज कडाडणार
टाटाच्या शिरकावाचा बेस्टच्या निवासी ग्राहकांवर भुर्दंड
मुंबई : स्वस्त विजेसाठी व्यावसायिक ग्राहक टाटा कंपनीकडे वळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे बेस्टच्या निवासी व छोट्या ग्राहकांवर दरवाढीचे संकट कोसळणार असल्याचे संकेत प्रशासनाने शुक्रवारी दिले़ मात्र टाटा कंपनीच्या स्पर्धेमुळे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी बेस्टचा हा उपचार रोगापेक्षाच जालीम ठरणार आहे़
शहरातील ग्राहकांना वीज पुरवठा करण्याची परवानगी टाटा कंपनीला मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमाचे कंबरडेच मोडले आहे़ याबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी चिंता व्यक्त करण्यात आली़ सद्यस्थितीत बंद गिरण्यांच्या जमिनीवरील मॉल्स, मल्टीप्लेक्स, व्यापारी संकुल येथे टाटामार्फत वीज पुरवठा केला जातो़ त्यामुळे या परिसरात टाटाची वीज वितरण व्यवस्था आहे़
मात्र बेस्टच्या वितरण क्षेत्रात टाटा कंपनीचे स्वत:चे जाळे नसल्याने बेस्टचे विद्यमान ग्राहक त्यांच्याकडे वळण्याची शक्यता सध्या कमी आहे़ यातून मार्ग काढण्यासाठी क्रॉस सबसिडीला मान्यता मिळविण्याचा बेस्टचा प्रयत्न सुरु आहे़ परंतु क्रॉस सबसिडीला महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने नकार दिल्यास छोट्या ग्राहकांच्या वीज दरामध्ये भरमसाठ वाढ करावी लागेल, असे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
बिझनेस प्लॅन विस्कळीत
विद्युत पुरवठा विभागाच्या नफ्यातूनच बेस्ट उपक्रमाची गाडी रस्त्यावर आहे़ त्यामुळे बेस्टने या विभागावर लक्ष केंद्रित करुन बिझनेस प्लॅन तयार केला होता़ मात्र टाटा कंपनीचा वीज पुरवठा शहरात सुरु झाल्यास बेस्टचा हा प्लॅन विस्कळीत होण्याची भीती महाव्यवस्थापक गुप्ता यांनी व्यक्त केली आहे़ या संकटातून मार्ग काढण्यासाठी १९ मे रोजी विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे़