कारच्या धडकेने बिबळ्या ठार

By Admin | Updated: January 15, 2015 23:17 IST2015-01-15T23:17:54+5:302015-01-15T23:17:54+5:30

तिने थांबण्याऐवजी पळ काढला. मागून येणाऱ्या वाहनचालकांना जेव्हा रस्त्यात बिबळ्या रक्तबंबाळ अवस्थेत दिसला तेव्हा तो प्रचंड वेगाने श्वास घेत होता

The slugs hit the car | कारच्या धडकेने बिबळ्या ठार

कारच्या धडकेने बिबळ्या ठार

सातिवली : भरधाव जाणाऱ्या कारने रात्री १०.३० च्या सुमारास जोडीने फिरणाऱ्या दोन बिबळ्यांना धडक दिल्याने त्यातल्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी अवस्थेत पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी घडली. जर धडक देणाऱ्या कारच्या चालकाने या अपघाताची माहिती पोलिसांना वेळीच देऊन डॉक्टरांना बोलवले असते तर या बिबळ्याचे प्राण वाचू शकले असते. परंतु, हा कारचालक पळून गेल्यामुळे बिबळ्याचे प्राण गेले.
ही घटना मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सातिवली फाट्यानजीक घडली. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या प्रशांत पाटील यांनी सांगितले की, मी घरी परतत असताना एक पांढ-या रंगाची कार माझ्याजवळून वेगाने गेली आणि काही क्षणाने तिने रस्ता ओलांडणाऱ्या बिबळ्याच्या जोडीला जबरदस्त धडक दिली. तिने थांबण्याऐवजी पळ काढला. मागून येणाऱ्या वाहनचालकांना जेव्हा रस्त्यात बिबळ्या रक्तबंबाळ अवस्थेत दिसला तेव्हा तो प्रचंड वेगाने श्वास घेत होता आणि त्याचा संपूर्ण चेहरा जखमी झाला होता. या मंडळींनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी डॉक्टरांना पाचारण केले. या सगळ्या धावपळीत एक तास निघून गेला. त्यामुळे बिबळ्याने घटनास्थळीच दम सोडला. तो एक वर्ष वयाचा होता आणि दुसरा बिबळ्या कुठे गेला, त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. रेंज फॉरेस्ट आॅफिसर एम.टी. अहिरे यांनी सांगितले की, ज्याअर्थी हा बिबळ्या एक वर्षाचा होता, त्याअर्थी त्यासोबतचा बिबळ्या त्याची आई असावी. ती जखमी होऊन जंगलात गेल्याने ती खवळून अधिक हिंस्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. तिला जर लवकर वैद्यकीय उपचार मिळाले नाही तर तिचाही मृत्यू त्याअभावी ओढावू शकतो. हा रस्ता अभयारण्यातून गेलेला असल्यामुळे वाहनचालकांनी हॉर्न वाजवू नये, वाहनाची गती हळू ठेवावी, असे आवाहन कारचालकांना केले आहे. परंतु, त्याचे पालन होत नाही, अशी माहिती स्थानिक पर्यावरणप्रेमी सलीम चराणिया यांनी दिली आहे. या दरम्यान वानगाव येथील एक महिन्यापूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या मादी आणि छावा बिबळ्यांच्या मृत्यूंमागील गूढही अद्याप उकलू शकलेले नाही. आम्ही त्यांच्या मृतदेहांच्या अवशेषांचे नमुने फोऱ्हँन्सीक लॅबोरेटरीजकडे पाठविल्यावर अहवाल येईतो काहीही सांगता येणार नाही, असे रेंज फॉरेस्ट आॅफिसर आशो बुरसे यांनी म्हटले आहे.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: The slugs hit the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.