बेस्टच्या बसखाली चिरडून बालिका ठार
By Admin | Updated: November 22, 2015 02:16 IST2015-11-22T02:16:45+5:302015-11-22T02:16:45+5:30
कुर्ला पश्चिम येथील भारतनगरमध्ये आईसमवेत भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये निघालेल्या आजरा चौधरी या ३ वर्षांच्या बालिकेचा बेस्टच्या बसखाली चिरडून मृत्यू झाला.

बेस्टच्या बसखाली चिरडून बालिका ठार
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील भारतनगरमध्ये आईसमवेत भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये निघालेल्या आजरा चौधरी या
३ वर्षांच्या बालिकेचा बेस्टच्या बसखाली चिरडून मृत्यू झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड करून चालकाला चोप दिला. त्याला अटक करण्यात यावी यासाठी सुमारे २ तास त्या मुलीचा मृतदेह घटनास्थळी ठेवण्यात आला होता. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बसचालक विनोद मोहितेला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर वातावरण निवळले.
कुर्ला भारत नगर परिसरात चौधरी कुटुंबीय राहत असून,
३ वर्षाची आजरा शनिवारी सायंकाळी ५च्या सुमारास आईसोबत भाजीबाजारात जात होती. त्यादरम्यान आईचा हात सोडून खेळताखेळता ती रस्त्यावर आली. त्याचदरम्यान पाठीमागून वेगात आलेल्या बेस्टच्या बसखाली ती चिरडली गेली. चालकाला बसवर नियंत्रण ठेवता न आल्याने पुढचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी बसमध्ये घुसून मोडतोड केली. घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलीस तेथे दाखल झाले. मात्र चालकाला तत्काळ अटक करण्याची मागणी करीत चौधरी कुटुंबीयांनी तब्बल २ तास आजराचा मृतदेह रस्त्यावरच ठेवला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर बसचालक विनोद मोहितेला अटक करून त्याच्यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.