धारावीकरांच्या आडमुठेपणामुळे स्कायवॉक रखडला
By Admin | Updated: August 25, 2015 03:11 IST2015-08-25T03:11:37+5:302015-08-25T03:11:37+5:30
म्हाडामार्फत माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शनपर्यंत उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंरतु स्कायवॉकच्या पायऱ्या दुकाने आणि घरांसमोर

धारावीकरांच्या आडमुठेपणामुळे स्कायवॉक रखडला
मुंबई : म्हाडामार्फत माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शनपर्यंत उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंरतु स्कायवॉकच्या पायऱ्या दुकाने आणि घरांसमोर नकोत, अशी आडमुठी भूमिका रहिवाशांनी घेतल्याने पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करून स्कायवॉक खुला करण्याचा निर्धार म्हाडा अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच स्कायवॉकच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी २१ कोटींचा निधी उपलब्ध होत नसल्याने स्वायवॉकचा दुसरा टप्पा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शन मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे स्वायवॉक उभारण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. पहिल्या टप्प्यातील स्कायवॉक बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २६० मीटर लांबीचा स्कायवॉक बांधण्यात येत असून, स्कायवॉकचे ९0 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु या मार्गावरील दुकानदार आणि रहिवाशांनी स्कायवॉकच्या पायऱ्या आपल्या दुकान आणि घरासमोर नकोत, यासाठी विरोध सुरू केला आहे. यातून मार्ग काढण्यात येत असून हा स्कायवॉक दोन वर्षांत खुला करण्यात येईल, असे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. धारावीत दुसऱ्या टप्प्यात ६४० मीटर लांबीचा स्वायवॉक उभारण्यात येणार आहे. सुमारे ३५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. म्हाडाकडे १४ कोटींचा निधी उपलब्ध असल्याने या निधीतून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २१ कोटींचा निधी आवश्यक असून, तो न मिळाल्याने काम रखडले आहे.