Join us  

मुंबईत सात महिन्यांत सोळा हजार डिलिव्हरी बॉइजवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:52 AM

बेशिस्तीला लगाम; वाहतूक नियमांचे केले उल्लंघन

मुंबई : ऑनलाइन मागविलेले खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढत असल्याने, त्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. मुंबईत वाहतूक पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये सोळा हजार डिलिव्हरी बॉइज विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. १३ मार्च ते २२ सप्टेंबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.अनेक खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्यात येतात. हे खाद्यपदार्थ लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉइजमध्ये स्पर्धा लागते. ग्राहकाला लवकरात लवकर डिलिव्हरी पोहोचवावी, तसेच जास्तीत जास्त डिलिव्हरी करावी, यासाठी डिलिव्हरी बॉइजमध्ये स्पर्धा असते, तर प्रत्येक डिलिव्हरीसाठी कंपनीकडून कमिशन दिले जाते. त्यामुळे जास्त डिलिव्हरी करून जास्त कमिशन मिळविण्याकडे त्यांचा कल असतो, परंतु कमिशनसाठी अनेकदा ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. या प्रकरणी कारवाई करत असलेल्या पोलिसांशीही वाद होतात. या बेशिस्त डिलिव्हरी बॉइजना लगाम घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी मार्चपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत १५ हजार ९८६ डिलिव्हरी बॉइजवर कारवाई करण्यात आली आहे. हेल्मेट न घालणे, मर्यादेपेक्षा अधिक वेग, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे इत्यादी नियम मोडल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमभंग करताना पुन्हा आढळल्यास यापेक्षा कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.स्विगीच्या डिलिव्हरी बॉइजची संख्या जास्त१३ मार्च ते २२ सप्टेंबरदरम्यान सोळा हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्विगीच्या डिलिव्हरी बॉइजनी सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. स्विगीच्या ६,५२० वाहकांवर कारवाई करण्यात आली असून, त्या पाठोपाठ ‘झोमॅटो’चे ५,१२८, डॉमिनोज पिझ्झाचे २,६११ तर ‘उबेर इट’च्या १,७२७ डिलिव्हरी बॉइजवर कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :झोमॅटोस्विगी