सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करणारे अटकेत
By Admin | Updated: May 30, 2017 06:37 IST2017-05-30T06:37:07+5:302017-05-30T06:37:07+5:30
पैशांसाठी नोकराने मालकाच्याच मुलीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी ट्रॉम्बे परिसरात घडली होती. याबाबत गुन्हे शाखा युनिट

सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करणारे अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पैशांसाठी नोकराने मालकाच्याच मुलीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी ट्रॉम्बे परिसरात घडली होती. याबाबत गुन्हे शाखा युनिट सहाने या अपहरणातील दोन आरोपींना सोमवारी गोवंडीच्या शिवाजीनगर येथून अटक केली आहे.
मानखुर्द महाराष्ट्रनगर येथे राहणारी ही मुलगी शनिवारी अचानक गायब झाली होती. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस या मुलीचा आणि अपहरणकर्त्याचा शोध घेत होते. तेव्हा रात्री अपहरणकर्त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून दहा लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मुलगी धारावीतील मुकुंदनगर परिसरात मिळून आली. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट सहादेखील करत होते. त्यांनी या मुलीला काही फोटो दाखवल्यानंतर मुलीने एका आरोपीच्या फोटोकडे बोट दाखवले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीची संपूर्ण माहिती हाती आल्यानंतर आरोपी इम्रान शेख (२४) गोवंडी शिवाजीनगर परिसरातच असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले. त्यांनी तत्काळ सापळा रचून सोमवारी सकाळी त्याला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात त्याला मदत करणारा अब्बास खान (३६) यालादेखील अटक केली असून दोघांनाही ट्रॉम्बे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.