सहा तासांत १६ घरांवर दरोडा
By Admin | Updated: May 9, 2016 03:45 IST2016-05-09T03:45:17+5:302016-05-09T03:45:17+5:30
उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेर गेलेल्या मुंबईकरांसाठी ही सुट्टी महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. कांजूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या अवघ्या ६ तासांत १६ घरफोड्यांच्या सत्राने एकच खळबळ उडाली आहे

सहा तासांत १६ घरांवर दरोडा
मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बाहेर गेलेल्या मुंबईकरांसाठी ही सुट्टी महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. कांजूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या अवघ्या ६ तासांत १६ घरफोड्यांच्या सत्राने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत तब्बल १०१ मुंबईकरांच्या घरांवर डल्ला मारण्यात आला आहे.
कांजूर पूर्वेकडील अशोकनगर परिसरात लुटारूंनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील कुलूप तोडून लाखोंची घरफोडी केली. घटनेची माहिती मिळताच कांजूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ए.एल. सातपुते यांच्यासह श्वान पथक, शोध पथक, गुन्हे तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील प्रत्येक घरातील फिंगरप्रिंट्स तसेच संबंधित पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता.
कांजूरच्या वीर सावरकर मार्गावर राहणारे विजय वसंत पेडणेकर हे कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात चोरी झाल्याची माहिती त्यांना शेजाऱ्यांकडून मिळाली. लुटारूंनी त्यांच्या घरातील दागिने आणि १० हजार रुपये रोख अशा एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी कांजूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी इसमाविरुद्ध कांजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर १६ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. १६ घरफोड्यांपैकी ६ जणांच्या घराचे कुलूप तोडले होते. इतर १० घरांतून ५ लाख ९ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार त्यांनी अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती कांजूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ए.एल. सातपुते यांनी दिली.
१८ एप्रिल ते ५ मेपर्यंत मुंबईतील विविध भागांत तब्बल १०१ घरफोड्या झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. यामध्ये १४ घरफोड्या या दिवसा घडलेल्या आहेत. यापैकी ६ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. नागरिकांनी बाहेर जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मुंबई पोलीस देत आहेत. (प्रतिनिधी)