लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धुळे येथे विधिमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा असतानाच शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपये सापडल्याची एसआयटी चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले.
फडणवीस म्हणाले, धुळ्याची घटना गंभीर असून सत्यता बाहेर आलीच पाहिजे. विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे योग्य नाही आणि ते कदापि सहनही केले जाणार नाही.
विधिमंडळ समित्यांची बदनामी योग्य नाही
विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांनी समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना मी त्यांना करणार आहे. विधिमंडळाच्या समित्यांना गौरवशाली परंपरा आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि विशेषत: विधिमंडळ समित्यांच्या कामकाजाला पूरक असे काम समित्यांमार्फत चालते. त्यामुळे धुळ्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी केलीच जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित
ज्याच्या खोलीत कोट्यवधी सापडले त्या किशोर पाटीलला निलंबित केल्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी जाहीर केले. तो विधानमंडळ कार्यालयात कक्ष अधिकारी आहे.
धुळ्यात नेमके काय घडले याची माहिती विधानमंडळाच्या पातळीवर घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे, तिचे मी स्वागत करतो. विधिमंडळ पातळीवरही स्वतंत्र निष्पक्ष चौकशी आम्ही करू.- प्रा.राम शिंदे, सभापती, विधान परिषद
धुळ्याच्या प्रकरणाची चौकशी विधिमंडळाकडून निश्चितपणे केली जाईल. कोणी दोषी आढळले तर कारवाई नक्कीच केली जाईल, आमच्यासाठी विधिमंडळाची प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. - राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा