को.रे.तील स्थानकात बसणार सरकता जिना
By Admin | Updated: January 10, 2015 02:10 IST2015-01-10T02:10:02+5:302015-01-10T02:10:02+5:30
मुंबईच्या उपनगरीय स्थानकांवर सरकते जिने बसविले जात असतानाच कोकण रेल्वे स्थानकांवरही सरकते जिने बसविण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांकडून घेण्यात आला होता.

को.रे.तील स्थानकात बसणार सरकता जिना
मुंबई : मुंबईच्या उपनगरीय स्थानकांवर सरकते जिने बसविले जात असतानाच कोकण रेल्वे स्थानकांवरही सरकते जिने बसविण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांकडून घेण्यात आला होता. त्यानुसार कणकवली स्थानकात पहिला सरकता जिना बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रेल्वेमंत्र्यांकडून ११ जानेवारीला कणकवली स्थानकातील एका उद्घाटन कार्यक्रमात या सरकत्या जिन्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात आले आहेत. पहिला सरकता जिना ठाणे आणि त्यानंतर दादरसह अन्य गर्दीच्या स्थानकांवर बसविण्यात आले. पश्चिम रेल्वे मार्गावर ६0 तर मध्य रेल्वे स्थानकांवर ३0पेक्षा अधिक सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. या सरकत्या जिन्यांचा प्रवाशांना चांगलाच फायदा मिळत असल्याने कोकण मार्गावरील स्थानकांवर त्याचा प्रयोग यशस्वी होतो का याची चाचपणी केली जात आहे.
यासाठी कोकण रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्याचा निर्णय झाला असून, खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभूही यासाठी आग्रही आहेत. त्यानुसार पहिला सरकता जिना कणकवली स्थानकात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. त्याची अधिकृत घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे येत्या ११ जानेवारी रोजी कणकवली स्थानकातील एका उद्घाटन कार्यक्रमात करणार आहेत. हा सरकता जिना बसविण्यास एक ते सव्वा महिना लागेल आणि त्यानंतर साधारपणे आणखी एक ते दीड महिना हा सरकता जिना सुरू करण्यास लागेल, असेही सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आणखी काही
प्रवासी सोयीसुविधांचीही घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून केली जाणार
आहे. (प्रतिनिधि)
कोकण रेल्वे स्थानकांवर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवर कोकणचा मेवा विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतानाच प्लॅटफॉर्मवर आसनव्यवस्था, टॉयलेटची उत्तम सुविधा, प्लॅटफॉर्मवर अपूर्ण छतांचे काम पूर्ण करण्यावर भर देण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घेतला.