Join us  

पाच वर्षीय भावाला बहिणीनेच दिले टिश्यू, पहिल्यांदाच बोनमॅरो शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 3:25 AM

बोरीवलीतील महापालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर आणि पिडीयाट्रिक हेमाटॉलॉजी - आॅन्कोलॉजी अ‍ॅण्ड बीएमटी या केंद्रात पहिल्यांदाच बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबई - बोरीवलीतील महापालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर आणि पिडीयाट्रिक हेमाटॉलॉजी - आॅन्कोलॉजी अ‍ॅण्ड बीएमटी या केंद्रात पहिल्यांदाच बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. थॅलेसेमिया रुग्णांमध्ये रक्ताची पातळी योग्य नसल्याने या रुग्णांना आयुष्यभर रक्त पुरवावे लागते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या या शस्त्रक्रियेद्वारे ५ वर्षीय विहानला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.विशेष म्हणजे विहानला त्याच्याच ११ वर्षीय बहिणीने टिश्यू दान केले आहे.विरारला राहणारा पाच वर्षांचा विहान ढेपे हा सहा महिन्यांपासून आजारी होता. त्याच्या शरीरातील लाल पेशींमध्ये कमतरता आढळून आली. या आजाराविषयी माहिती मिळताच विहानला त्याच्या आईवडिलांनी बोरीवली येथील या बीएमटी केंद्रात दाखल केले. सहा महिने विहानला रक्त चढवावे लागले. त्यानंतर विहानच्या वैद्यकीय तपासण्याअंती डॉक्टरांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.या शस्त्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे, विहानच्या ११ वर्षीय जिया या बहिणीने आपल्या छोट्या भावाला बोनमॅरो दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जियाच्या वैद्यकीय तपासण्या करून २५ जून २०१८ रोजी हे पहिलेच बोनमॅरो ट्रान्सप्लांट बोरीवली येथील केंद्रात यशस्वीरीत्या पार पडले. जियाच्या बोनमॅरोचे काही टिश्यू काढून विहानला प्रत्यारोपित करण्यात आले. त्यानंतर नुकतेच २ आॅगस्ट रोजी विहानला या केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला. याविषयी विहानचे वडील जितेंद्र ढेपे यांनी सांगितले की, विहान ४६ दिवस रुग्णालयात होता. आता त्याची प्रकृती स्थिर आहे, आयुष्यभराच्या त्रासातून तो बरा झाला याचा आनंद आहे.शस्त्रक्रियेचा खर्च डोनर फंडिंगमधून२०१७ च्या एप्रिल महिन्यात हे केंद्र रुग्णांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. या केंद्रात शस्त्रक्रियेची सुविधा मोफत दिली जाते. हा खर्च डोनर फंडिंगच्या माध्यमातून केला जातो. बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी रक्ताचे नाते असलेल्याच व्यक्तीची आवश्यकता असते, मात्र अनेकदा जनजागृतीचा अभाव असल्याने दाता मिळत नाही. अनेकदा वेळेवर बोनमॅरो किंवा मग रक्तपेशी उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे याकरिता जनजागृतीसह नोंदणी करणे आवश्यक आहे.- डॉ. ममता मंगलानी, संचालिका, सुपरस्पेशालिटी थॅलेसेमिया केअर सेंटरभावाकडून ब्लड स्टेमसेल्स दानविजापूर येथील १२ वर्षीय अपूर्वा सनदी हिच्यावरही बोनमॅरो शस्त्रक्रिया करण्यात आली. अपूर्वाला गेल्या अनेक वर्षांपासून सेव्हेर अप्लास्टिक अ‍ॅनेमियाचा त्रास आहे. यात तिला सातत्याने पेशी आणि प्लेटलेट्स चढवावे लागतात. या कठीण परिस्थितीत अपूर्वाच्या लहान भावाने आर्यने तिला ब्लड स्टेमसेल्स दान केल्या. तिच्यावर १८ जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर ३ आॅगस्ट रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :आरोग्यबातम्या