सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
By Admin | Updated: April 19, 2015 01:50 IST2015-04-19T01:50:28+5:302015-04-19T01:50:28+5:30
सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.

सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
मुंबई : सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. रुग्णाच्या नातेवाइकाने केलेल्या मारहाणीत निवासी डॉक्टर जखमी झाला असून, त्याचा स्टेथस्कोप तुटला असून, शर्ट फाटला आहे.
मेडिसीन विभागातील निवासी डॉक्टर रमेश राठोड हा शनिवारी दुपारी २ वाजता वॉर्ड क्रमांक ७मध्ये होता. या वेळी एका रुग्णाने आणि त्याच्या नातेवाइकाने डॉक्टरशी वाद घालायला सुरुवात केली.
डॉक्टरने शांत राहा सांगूनही त्यांनी ऐकले नाही आणि हमरीतुमरीला सुरुवात केली. रुग्णाचा नातेवाईक स्टीलचा रॉड घेऊन डॉक्टरला मारायला आला होता.
वॉर्ड क्रमांक ७मध्ये गोंधळ सुरू असल्याचे लक्षात आल्यावर इतर निवासी डॉक्टर तिथे आल्याने डॉ. रमेश याला जास्त प्रमाणात मारहाण झाली नाही.
रुग्णाच्या नातेवाइकाने सकाळी १० वाजता तुला मारीन अशी धमकी दिली होती. पण, नातेवाईक आणि रुग्ण असे काहीही बोलत असतात, यामुळे त्याच्याकडे डॉक्टरने दुर्लक्ष केले. दुपारी २ वाजता ही घटना
घडली तेव्हा त्या वॉर्डच्या जवळच दोन महिला सुरक्षारक्षक होत्या. डॉक्टरला मारहाण केलेल्या व्यक्तीने नशा केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
सुरक्षारक्षकांची कमतरता असल्यामुळे अशा घटना घडत असतात. रुग्णालयात सुरक्षारक्षक वाढवण्याची गरज आहे. निवासी डॉक्टर रुग्णालयात आणि वसतिगृहातही सुरक्षित नाहीत. याविषयी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केलेली आहे. मारहाणीच्या प्रकरणात सायन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे मार्डतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
डॉक्टरला मारहाण करणाऱ्या इरफान अहमद इकरार (२३) याला सायन पोलिसांनी अटक केली आहे. तर, रुग्ण अरीफ नझीम (२५) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.