Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायक पपॉनने सोडलं 'व्हॉईस इंडिया किड्स' शोचं परीक्षक पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 18:44 IST

प्रेक्षकांकडून होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता गायक पपॉनने शोच्या परीक्षकाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पपॉन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या कार्यक्रमादरम्यान एका स्पर्धकाला किस केल्यामुळे पपॉनवर टीकेचा भडीमार होतो आहे. प्रेक्षकांकडून होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता गायक पपॉनने शोच्या परीक्षकाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

'व्यावसायिकदृष्ट्या एखादी जबाबदारी पूर्ण करण्याच्या मानसिकतेत मी सध्या नसल्याने मी शोच्या परीक्षकपदावरून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं ते प्रकरण पूर्णपणे सोडवलं जाईपर्यंत व तपास पूर्ण होईपर्यंत मी कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका पार पाडणार नाही. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे खरं काय ते लवकर समोर येईलच, असं पपॉनने ट्विटरवर म्हंटलं आहे. एक पत्रक प्रसिद्ध करून शोच्या परीक्षकांची जबाबदारी सोडत असल्याचं पपॉनने स्पष्ट केलं.

 

मी काहीही चुकीचं केलेलं नाही, पपॉनचं स्पष्टीकरण'सध्या माझ्याबाबत जी काही चर्चा सुरु आहे, ते पाहून अत्यंत त्रास होत आहे. जे कुणी मला ओळखतात, त्यांना माहित आहे, की मी अत्यंत सहज आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा व्यक्ती आहे. माझ्या फेसबुकवरचा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहा आणि विचार करा की जर काही चुकीचं असतं तर मी स्वतःच तो व्हिडीओ का प्रमोट केला असता का? असा सवाल त्याने विचारला आहे.

काय आहे प्रकरण - 'व्हॉईस इंडिया किड्स' या टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोच्या होळी स्पेशल भागाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला. पपॉन या कार्यक्रमात परीक्षक आणि स्पर्धकांचा मार्गदर्शक (मेंटॉर) आहे. होळी स्पेशल भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर पपॉन सगळ्या लहान मुलांसोबत होळी खेळत होता. मात्र, त्याने यापैकी एका स्पर्धक मुलीच्या गालाला रंग लावल्यानंतर तिचे चुंबन घेतले. या सगळ्या प्रसंगाचे चित्रण करून तो व्हिडीओ पपॉनच्या फेसबूक पेजवर लाईव्ह करण्यात आला होता . सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, हे फेसबुक लाईव्ह पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील वकील रुना भुयान यांनी आक्षेप घेत पपॉनविरुद्ध पॉस्को कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. रूना भुयान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अल्पवयीन मुलीशी अशाप्रकारचे वर्तन करणे धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला रिअॅलिटी शो मधील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते. याठिकाणी स्पर्धकांमध्ये अनेक अल्पवयीन मुली आहेत. मात्र, त्यावेळी तिथे एकही महिला क्रू मेंबर नव्हती, असा आक्षेप रुना भुयान यांनी तक्रारीत नोंदवला आहे.

टॅग्स :पपॉन