डीम्ड कन्व्हेअन्ससाठी एकखिडकी योजना
By Admin | Updated: August 29, 2014 00:45 IST2014-08-29T00:45:44+5:302014-08-29T00:45:44+5:30
डीम्ड कन्व्हेअन्स अर्थात मानीव हस्तांतरण प्रक्रिया अधिक गतिमान तथा पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे

डीम्ड कन्व्हेअन्ससाठी एकखिडकी योजना
नवी मुंबई: डीम्ड कन्व्हेअन्स अर्थात मानीव हस्तांतरण प्रक्रिया अधिक गतिमान तथा पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून एकखिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे डीम्ड कन्व्हेअन्ससाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, असा विश्वास सिडकोच्या वतीने व्यक्त केला आहे.
डीम्ड कन्व्हेअन्स करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. विहित नमुन्यात भरलेला अर्ज व त्याबाबतची कागदपत्रे आता या एकखिडकी योजनेनुसार बेलापूर येथील रायगड भवनच्या तिसऱ्या मजल्यावरील सहकारी संस्था सहनिबंधक कार्यालयात सादर करायची आहेत.
दरम्यान, सिडकोने भाडेकराराने येथील भूखंड विकले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील लीज हस्तांतरण हेच कन्व्हेअन्स डीड ठरते. ६0 टक्के सदनिका विक्री झाल्यावर विकासकांनी चार महिन्यांच्या आत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून देणे बंधनकारक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. गृहनिर्माण संस्थेची स्थापना झाल्यानंतर पुढील चार महिन्यांत लीज हस्तांतरण करून देणेही बंधनकारक असल्याचे सिडकोने म्हटले आहे. त्याशिवाय सिडकोने वाटप केलेल्या निविदा काढून विकलेल्या भूखंडांवरील सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरीत केलेल्या भूखंडांवरील गृहनिर्माण संस्थांच्या अभिहस्तांतरणासाठी मूळ मालकाची गरज असते. मात्र अनेकदा मूळ मालक अभिहस्तांरणास सहकार्य करीत नाहीत. अशावेळी संबंधित संस्थांना अभिहस्तांतरणाचा अर्ज करून संबंधित भूखंडाचे लीज आपल्या नावावर करून घेता यावे, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. (प्रतिनिधी)