अलिबागेत आज मूक मोर्चा
By Admin | Updated: February 22, 2015 22:30 IST2015-02-22T22:30:41+5:302015-02-22T22:30:41+5:30
लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला.

अलिबागेत आज मूक मोर्चा
अलिबाग : लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी हा संदेश देण्यासाठी अलिबाग तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरुन मूक मोर्चा काढणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सरकार बदलल्याने समाजातील विघातक प्रवृत्तींना आळा बसत नसून समाजालाच कलंक लावणारे असे प्रकार घडतच आहेत. कायदा कठोर असून देखील पोलीस यामध्ये साधा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात. हा प्रकार खूपच संतापजनक आहे. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरावे लागते.
रोहा - लोणावळा येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी या प्रकरणाच्या निषेधार्थ २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. रोहा दमखाडी नाका येथून रोहा तहसील कार्यालयापर्यंत संतप्त मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सर्व रोहेकरांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. लोणावळा येथील लग्नसमारंभात कुटुंबीयांसोबत सहभागी झालेल्या मुलीवर भर कार्यक्रमात तिला पळवून नेऊन तिचा केलेला खून हा लांच्छनास्पद प्रकार असून याला आळा घालण्यासाठी व संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)