Join us

पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 12:06 IST

मुंबईकरांसाठी आठवड्याची सुरुवात लोकल बिघाडामुळे संतापजनक ठरली आहे. सकाळी पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला.

मुंबई-

मुंबईकरांसाठी आठवड्याची सुरुवात लोकल बिघाडामुळे संतापजनक ठरली आहे. सकाळी पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटच्या दिशेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर आता मध्य रेल्वेवरही चाकरमान्यांना प्रवास कोंडीला सामोरं जावं लागत आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीराने सुरू आहे. 

मध्य रेल्वेच्या भायखळा ते सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेवर गेले तीन दिवस विविध कामांसाठी तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे आधीच प्रवाशांना तीन दिवस अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यात सोमवारी कामावर जाताना ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचं रडगाणं पुन्हा सुरू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

सीएसएमटी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानकात येणाऱ्या लोकलवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर बोरीवली, कांदिवली, मालाडसह वसई, नालासोपारा, विरार स्थानकांवर गर्दी उसळली आहे.