Join us  

छोटे-मोठे उद्घाटन खासदार, महापौर यांच्या हस्ते पण करा, अरविंद सावंत यांचा भाजप मंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:11 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी एसी लोकल आणि इतर अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले.

मुंबई : मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुंबई, ठाणे, रायगड येथील सर्व खासदारांना आमंत्रणच दिले नाही. मुंबईच्या महापौरांचे, खासदारांची नावे निमंत्रण पत्रिकेच्या नावांच्या गर्दीमध्ये लिहिली आहेत, हे ज्याने केले त्यांच्यावर कारवाई करा. रेल्वेच्या प्रश्नासाठी आम्ही झगडायचे, श्रेय रेल्वेमंत्र्यांनी घ्यायचे. सर्व उद््घाटने रेल्वेमंत्र्यांच्याच हस्ते करण्यापेक्षा छोट्या-मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन खासदार, महापौर यांच्या हस्ते करा, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांना लगावला.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी एसी लोकल आणि इतर अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या वेळी सावंत म्हणाले, रेल्वेच्या प्रत्येक प्रकल्पाचे उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा अट्टाहास कशासाठी? मुंबई, ठाणे, रायगड येथील खासदारांना उद्घाटन करण्याची संधी द्या. यामुळे नागरिकांचा सहभाग वाढेल. प्रकल्पाची माहिती प्रत्येकाला होईल. मुंबई महानगरातील प्रकल्पाचे उद्घाटन एकाच ठिकाणी होते. डिजिटायझेशनचे जग आहे, हे मान्य आहे. पण शौचालय, सरकते जिने यांचे उद्घाटनही व्हिडीओद्वारे केले जाते. रेल्वे अधिकाऱ्यांना मराठी येते की नाही, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळेच कार्यक्रमाचे नियोजन अशा चुकीच्या प्रकारे झाले. निमंत्रण पत्रिकेच्या नावांच्या गर्दीत आमची नावे लिहिली जातात. ज्यांनी कोणी हे केले, त्यांचावर कारवाई करावी. आम्ही खासदार रेल्वेच्या कामांसाठी झगडतो. त्यानंतर ती कामे होतात. मात्र श्रेय आम्हाला मिळत नाही. त्यामुळे नागरिक विचारतात. ते सर्व रेल्वेमंत्र्यांनी केले. मात्र हे मुंबईतच होते. बाहेर यूपीमध्येच असे करा. बघा यूपीवाले काय करतात. संसद जगू देणार नाही, असे सावंत म्हणाले.महिला डब्यात शौचालय हवेसीएसएमटी ते कसारा, चर्चगेट ते डहाणू असा प्रवास प्रवासी दररोज करतात. यामध्ये गरोदर महिला, ज्येष्ठ महिला, रुग्ण महिला प्रवास करतात. अडीच तासांच्या प्रवासात शौचालयाला जाण्याचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे महिला डब्यात शौचालय उभारण्यात यावे. मानखुर्द येथील ब्रॉडगेज मार्गिकांचा वापर दिवसा लोकलसाठी करावा. रात्री येथून मालवाहतूक करण्यात यावी. प्रत्येकवेळी चांगल्या गोष्टी पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करतात. मध्य रेल्वे मार्गावरही कधीतरी प्रेम करा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

टॅग्स :अरविंद सावंत