घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण
By धीरज परब | Updated: August 29, 2022 20:14 IST2022-08-29T20:14:49+5:302022-08-29T20:14:58+5:30
सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण
मीरारोड - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी भल्या पहाटे बिबट्या वाघाचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे . तसे पाहता ह्या भागात बिबट्या वाघांचा वावर नवीन नसला तरी वन विभागाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
घोडबंदर गावा लगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत. घोडबंदर गाव व घोडबंदर किल्ला परिसरात बिबट्या वाघांचा वावर नवीन नाही. अनेकवेळा बिबट्या , बिबट्याची पिल्ले दिसून आली आहेत.
सोमवारी पहाटे घोडबंदरच्या बामणदेव मणिदर जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बिबट्या दिसून आला . त्यावेळी तेथे असलेल्या परिवहन सेवेतील बस वाहकाला बिबट्याचे दर्शन झाले असता त्याने चित्रीकरण केले . सदर सार्वजनिक शौचालयाचा वापर परिसरातील रहिवाशी पहाटे पासून रात्री पर्यंत करत असतात . बिबट्या मोठा असल्याने रहिवाश्यां मध्ये भीतीचे वातावरण आहे.
सदर बिबट्या वाघ हा पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकारी मनोज पाटील यांनी व्यक्त केला. वन विभागा मार्फत परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला असून जनजागृती केली जाणार आहे. काही दिवसां पूर्वी देखील परिसरात बिबट्या दिसून आला होता असे ते म्हणाले.