Join us  

सिद्धार्थ संघवी हत्याप्रकरण: मित्राने मोबाइल आॅन केला म्हणून शेख पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 5:34 AM

आरोपीच्या कोठडीत २ दिवसांची वाढ, चालक परवाना बनावट असल्याचा संशय

मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी अटक सरफराज शेखच्या कोठडीत बुधवारी भोईवाडा न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे २१ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.तपासात शेखचा मोबाइल त्याच्या मित्राने सुरू केला म्हणून शेखपर्यंत पोलीस पोहचल्याचेही समोर आले. मलबार हिल येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ संघवी यांची ३० हजारांच्या लुटीच्याच उद्देशानेच ५ सप्टेंबरला हत्या केल्याची कबुली शेखने दिली. बुधवारी त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. शेख तपासात सहकार्य करत नसल्याने तपासात अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.या गुन्ह्यात अन्य साथीदारांचा समावेश आहे का? याबाबत अद्याप काहीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. हत्येतील पुरावे शेखने मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पुराव्यांचा शोध सुरू आहे. शेखकडील चालक परवानाही बनावट असल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत माहिती देताना तो दिशाभूल करत असल्याचे सांगत पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.हत्येनंतर संघवींचा मोबाइल शेखकडे होता. ८ तारखेला संघवी मित्राला भेटला. तेव्हा, मित्राने शेखच्या नकळत मोबाईल सुरु केला. दरम्यान संघवीच्या वडिलांचा कॉल आला. त्यामुळे घाबरून शेखने कॉल कट केला. नंतर ते पोलिसांत जावू नये म्हणून त्यांना कॉल केला, याचीही पोलीस शहानिशा करत आहेत.

टॅग्स :खूनपोलिस