आजारी विद्यार्थी वा-यावर
By Admin | Updated: March 14, 2015 01:41 IST2015-03-14T01:41:30+5:302015-03-14T01:41:30+5:30
राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. परंतु स्वाइन फ्लूबाबत मुंबई विद्यापीठ

आजारी विद्यार्थी वा-यावर
मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. परंतु स्वाइन फ्लूबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासन आजही झोपेत असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये असलेल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी विद्यार्थी पोहोचत असले तरी तेथे डॉक्टरच नसल्याने विद्यार्थ्यांना उपचाराविना राहावे लागत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसवर धडक देऊन कुलगुरूंना मास्क भेट दिला.
कलिना कॅम्पसमधील आरोग्य केंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने मनविसेने यापूर्वीही विद्यापीठात आंदोलन केले होते. यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत ठोस पावले उचललेली नाहीत. राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून याला आळा घालण्यासाठी विविध स्तरांवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी विद्यापीठ प्रशासनाला नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
स्वाइन फ्लूबाबत विद्यापीठाने जनजागृती करण्याऐवजी विद्यापीठात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे काही विद्यार्थी आजारी आहेत. ते आरोग्य केंद्रात गेले असता त्यांना कोणतेही उपचार मिळू शकले नाहीत. याच्या निषेधार्थ मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. यानंतर त्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. यामध्ये सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला परिपत्रक पाठवून सूचना देण्यात येतील. तसेच विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील पूर्णवेळ डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, दोन लॅब टेक्निशियन आणि दोन नर्स यांची पदे २ एप्रिलपासून भरण्यात येतील, असे आश्वासन वेळूकर यांनी मनविसे शिष्टमंडळाला दिले आहे. (प्रतिनिधी)