वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट
By Admin | Updated: February 23, 2015 01:06 IST2015-02-23T01:06:24+5:302015-02-23T01:06:24+5:30
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर डाव्या संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला

वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट
मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर डाव्या संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठ, उद्याने व चौपाटी या वर्दळीच्या परिसरात शुकशुकाट होता. सायंकाळनंतर काही प्रमाणात वर्दळ वाढली. आक्रमक झालेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी रास्तारोको करीत पानसरे यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला.
रिपाइं अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्वत: मोर्चाचे नेतृत्व करीत चेंबूर येथील पांजरापोळ येथे रास्तारोको केला. तर काही कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमारे अर्धा तास येथील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या वेळी आठवले म्हणाले की, पानसरे यांची हत्या म्हणजे राज्याच्या प्रतिमेला लागलेला कलंक आहे. हा कलंक धुऊन काढायचा असेल, तर मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. शिवाय हल्ल्यामागील सूत्रधारांना अटक करण्यासाठी घटनेचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
मलबार हिल, ताडदेव सर्कल, वरळी या ठिकाणीही रिपाइंतर्फे रास्तारोको करण्यात आला. ताडदेव सर्कल येथील वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करणाऱ्या रिपाइंचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सो.ना. कांबळे यांना काही कार्यकर्त्यांसह ताडदेव पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी कांबळे यांनी मारेकऱ्यांना तत्काळ पकडून फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वरळी नाका येथे स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियातर्फे निदर्शने करण्यात आली. येथील कुरणे चौक व वरळी नाका परिसरात बंद पाळण्यात आला. दरम्यान, सरकारचा निषेध करण्यासाठी जनशक्ती कार्यालय ते वरळी नाक्यापर्यंत निषेध रॅली काढली. चौकात पोहोचलेल्या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी क्रांतिकारी गीतांचे सादरीकरण करीत रोष व्यक्त केला. छात्रशक्ती आणि विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला. संघटनेतर्फे ठिकठिकाणी शांतता रॅली काढण्यात आल्या. दोषी आढळणाऱ्या संस्थांना आतंकवादी संघटना घोषित करून बंदी घालण्याची मागणी संघटनेच्या राज्याध्यक्षा ज्योती बडेकर यांनी केली. (प्रतिनिधी)