उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड
By Admin | Updated: May 28, 2015 23:00 IST2015-05-28T23:00:59+5:302015-05-28T23:00:59+5:30
निवडणूक यंत्रणेने आॅनलाइन प्रक्रिया स्थगित केल्यानंतर गुरुवार सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड
वसई : निवडणूक यंत्रणेने आॅनलाइन प्रक्रिया स्थगित केल्यानंतर गुरुवार सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली. एकूण १० ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अनेक उमेदवार आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी या केंद्रात येत होते.
वसई-विरार शहर मनपाच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ मेपासून उमेदवारी अर्ज, विक्री व स्वीकारणे यास सुरुवात झाली. मात्र, गेले ५ दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. या वेळी निवडणूक यंत्रणेने सुरू केलेल्या आॅनलाइन प्रक्रियेचा बोजवारा उडाल्यामुळे यंत्रणेला आॅफलाइन प्रक्रिया सुरू करावी लागली. आॅफलाइन प्रक्रिया सुरू होताच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये बहुजन विकास आघाडी, शिवसेना तसेच काही अपक्षांचा समावेश होता. आॅनलाइन प्रक्रियेमुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता. या प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज अपलोड करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे उमेदवारांना ३ ते ४ दिवस अतोनात त्रास सहन करावा लागला होता. याबाबत, अनेक तक्रारी आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया बंद केली. त्यामुळे उमेदवारांची प्रत्येक केंद्रावर गर्दी होऊ लागली.
माझी आमदार विवेक पंडित व त्यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गट यांच्यासाठी शिवसेना, भाजपाने १२ जागा सोडण्याची तयारी दाखविली होती. परंतु, त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुका लढवाव्यात तरच या जागा सोडल्या जातील, अशी अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली होती. ती अखेर पंडित यांनी मान्य केली आहे. त्यानुसार या १२ पैकी काही जागांवर पंडित गटाच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या एबी फॉर्मसह अर्ज भरून या अटीची पूर्तताही केली आहे. असे असले तरी पंडित गटाच्या अन्य उमेदवारांनी स्वतंत्र अथवा अन्य स्वरुपात या मतदारसंघात अर्ज दाखल केले आहेत काय? यावर शिवसेनेचे नेते बारकारईने लक्ष ठेवून आहेत. असे आढळल्यास या उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याची सिद्धता सेनेने केली आहे.
बऱ्याच राजकीय पक्षात कोणत्या वॉर्डातून अधिकृत उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे. जिथे उमेदवाराबाबत एकमत झाले नाही. तिथे तूर्तास दोन-तीन इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. ऐनवेळी एकाची निवड करून बाकीच्यांना माघार घ्यायला लावू, असे धोरण काही पक्षांनी अनुसरले आहे. त्यामुळे नेमका अधिकृत कोण आणि डमी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण प्रत्येकजण मीच अधिकृत उमेदवार असा दावा करतो आहे. तर काही पक्षात वरून दबाव आणून ऐनवेळी निवडलेले उमेदवार बदलण्याची खेळी खेळली जात असल्याने नवाच गोंधळ उद्भवतो आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षात उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार कोण? हा प्रश्न अद्यापही अधांतरी आहे. काँग्रेसने राजेंद्र गावीत यांच्याकडे सूत्रे सोपविली असली तरी इच्छुकांत त्याबाबत संभ्रम आहे. तसेच राष्ट्रवादीतही आहे. त्याचाही फटका पक्षांना व उमेदवारांना सध्या बसतो आहे.