Shree Siddhivinayak Mandir: जगभरातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर याचा उल्लेख आवर्जून केला जातो. मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिर अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. हजारो भाविक दररोज सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला येत असतात. विनायक चतुर्थी अंगारक योग असो किंवा संकष्ट चतुर्थी अंगारक योग असो श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होतो. प्रत्येक मंगळवारीही नित्य नियमाने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मुंबईत फिरण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती सिद्धिविनायकाचे दर्शन वेळात वेळ काढून घेतात. याच श्री सिद्धिविनायक मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. भाविकांनी यंदाच्या वर्षात दिलेल्या भरभरून दान, देणगी यांमुळे मंदिराचे उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय परंपरा, संस्कृती यांमध्ये दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरातील मंदिरांमध्ये भाविक दान-धर्म करतात, देणगी देत असतात. ते मंदिर आपल्या आराध्य देवतेचे किंवा कुलदेवतेचे असेल, तर आवर्जून दान केले जाते, देणगी दिली जाते. विविध स्वरुपात दान केले जाते. तसेच विविध कारणांसाठीही दान केले जाते, देणगी दिली जाते. श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक येऊन गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांकडून येणाऱ्या दान, देणगीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले जात आहे.
भाविकांचे भरभरून दान, १५ टक्के वाढ; ‘इतके’ कोटी झाले उत्पन्न
मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी गत आर्थिक वर्षांत भरभरुन दान दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरात श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०२४-२५ या वर्षांत न्यासाचे उत्पन्न ११४ कोटी इतके अपेक्षित होते, विक्रमी १३३ कोटींच्या घरात गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. आशिर्वचन पूजा देणगी, लाडू व नारळवडी अशा विविध माध्यमातून मंदिराचे उत्पन्न वाझले. सन २०२५-२६ या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न १५४ कोटी इतके गृहीत धरण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही भाविक, भक्त गणरायाच्या चरणी भरुभरुन दान, देणगी देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यंदा न्यासकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी ०८ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्यात येणार आहे. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक संस्थानचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे सन २०२४-२५चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन २०२५-२६चे अर्थसंकल्पी अंदाजपत्रक विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आले.