भिवंडी नागरिक बँकेच्या संचालकांना शो-कॉज
By Admin | Updated: December 7, 2014 23:36 IST2014-12-07T23:36:58+5:302014-12-07T23:36:58+5:30
चौकशीची मागणी करून बँकेच्या सभासदांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली

भिवंडी नागरिक बँकेच्या संचालकांना शो-कॉज
भिवंडी : शहरातील नागरिकांनी २०१३ साली स्थापन केलेल्या नागरिक सहकारी बँकेत गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या सहकारी क्षेत्रातील काही अधिकारी, बँकेतील काही संचालक व बँक प्रशासन यांच्या अभद्र युतीमुळे गैरव्यवहार झाला आहे. चौकशीची मागणी करून बँकेच्या सभासदांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली. या घटनेस केवळ ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त का करू नये,अशी विचारणा करणारी बँक संचालकांना नोटीस जारी केली आहे.
भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायास प्रगतीपथावर नेण्यासाठी शहरातील व्यापारी व मान्यवर लोकांनी मिळून या बँकेची मुहूर्तमेढ रोवली. वास्तविक, भ्रष्ट कारभारामुळे बँकेच्या संचालकांमध्ये गट पडले आहेत. शकील हाजी अहमद विंचू यांनी २६ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला, त्यावेळी जिल्हा निबंधकांनी चेअरमनपदाची निवड करणे क्रमप्राप्त होते. तसे न झाल्याने बँकेचे उपाध्यक्ष मनमानी पद्धतीने काम करतात,अशा तक्रारी ९ मे २०१४ रोजी ७ संचालकांनी दिल्या. त्यावरही कारवाई न झाल्याने ९ जून २०१४ रोजी ९ संचालकांनी जिल्हा निबंधकांकडे राजीनामे दिले. जिल्हा उपनिबंधकांनी बँकेच्या सर्व संचालकांना नोटीस पाठवून संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती का करू नये? अशी विचारणा केली आहे.
(प्रतिनिधी)