मुंबई : परिवहन विभागात (आरटीओ) मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे. अलीकडेच ३३१ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना (एआयएमव्ही) पदोन्नती देऊन मोटार वाहन निरीक्षक (आयएमव्ही) करण्यात आल्याने अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. परिणामी राज्यभरात अपर परिवहन आयुक्तांपासून एआयएमव्हीपर्यंत ७००हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे.
आरटीओमध्ये एकूण २,३५२ मंजूर पदे असून, त्यापैकी १,८५२ पदे भरलेली आहेत. याशिवाय क्लार्कच्या ३५ ते ४० टक्के पदांवर भरती झालेली नाही. राज्यातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी, नोंदणी, परवाने, फिटनेस व प्रदूषण चाचणी, अपघात चौकशी, रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी या जबाबदाऱ्या पार पाडताना मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
सध्या राज्यात ५८ आरटीओ कार्यालये आहेत. दररोज हजारो नागरिक वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी, वाहन फिटनेस व प्रदूषण तपासणी करतात. मात्र, डेप्युटी आरटीओ, असिस्टंट आरटीओ, आयएमव्ही, एआयएमव्ही आणि क्लार्कची शेकडो पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.
नवीन ८ आरटीओ कार्यालयांसाठी २२१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
ठाण्यातील मीरा-भाईंदरसह राज्यात नुकतीच ८ नवीन आरटीओ कार्यालये स्थापन केली आहेत. त्यासाठी विविध संवर्गातील २२१ नवीन नियमित पदांना तसेच २१ वाहनचालकांच्या मनुष्यबळ सेवांना (बाह्य यंत्रणेमार्फत) मंजुरी दिली आहे. या कर्मचाऱ्यांचा पुरवठा इतर आरटीओला करावा लागणार असल्याने याचा भार परिवहन विभागाच्या कामकाजावर होणार आहे.
अनेक कामे रखडतात. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. परिवहन विभागाने यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली.