काँग्रेसच्या मंदीविरोधी आंदोलनाला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:46 IST2019-09-20T01:46:53+5:302019-09-20T01:46:59+5:30
देशातील आर्थिक मंदी आणि बेरोजगारी विरोधात मुंबई काँग्रेसने गुरूवारी मोर्चा काढला.

काँग्रेसच्या मंदीविरोधी आंदोलनाला अल्प प्रतिसाद
- गौरीशंकर घाळे
मुंबई : देशातील आर्थिक मंदी आणि बेरोजगारी विरोधात मुंबई काँग्रेसने गुरूवारी मोर्चा काढला. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयापासून आजाद मैदानापर्यंत निघालेल्या या मोर्चाला मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या तुरळक गर्दीमुळे आंदोलक कमी आणि नेते जास्त अशीच स्थिती आंदोलना दरम्यान पाहायला मिळाली.
जीएसटीमुळे देशात मोठी आर्थिक मंदी आली असून बेरोजगारी आणि सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठ्या महागाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी यावेळी केला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही कारभारामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनता शिवसेना भाजप सरकारवर प्रचंड नाराज आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळणार आहे.
सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागा. जमिनीवर उतरा. लोकांना घराघरात जाऊन शिवसेना भाजपचे अपयश आणि खोटी आश्वासने सांगा. त्यांचा भ्रष्टाचार समजवून सांगा, अशी सूचनाही एकनाथ गायकवाड यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार भाई जगताप म्हणाले की, सध्याची कंपन्यांची आणि उद्योगधंद्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अनेक कंपन्या दोन दोन आठवडे बंद ठेवत आहेत. अनेक मोठे उद्योगपती उघडपणे भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत आहेत. लघु उद्योगधंदे संपले. पण भाजप सरकारला याची चिंता नाही त्यांना फक्त निवडणूक जिंकायच्या आहेत त्यामध्ये ते व्यस्त असतात.
यावेळी आमदार वर्षा गायकवाड, काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, मुंबई महिलाध्यक्षा अजंता यादव यांचीही भाषणे झाली. या आंदोलनात माजी आमदार चरण सिंग सप्रा, अशोक जाधव, चंद्रकांत हंडोरे, मधू चव्हाण यांच्यासह नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.