मुंबई - मुंबईकरांच्या लाडक्या बाप्पाचे दोन दिवसांनी आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी बाजारात खरेदीला उधाण आले आहे. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने महामुंबईकरांनी गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीचा मुहुर्त साधला. त्यामुळे दादरच्या बाजारपेठेसह इतर प्रमुख बाजारपेठांचा परिसर गर्दीने फुलून गेला.
दादर पश्चिमेतील एन. सी. केळकर मार्ग, छबिलदास रस्ता, रानडे रस्ता, कबुतरखाना या परिसरात सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली. बाजारात रंगीबेरंगी मखर, फुलांचे हार, तोरणे, अक्षता, दुर्वा, तसेच सजावटीसाठी फुलांचे गुच्छ यांनी बाजारपेठ भरून गेली होती. सजावटीचे वेगवेगळे साहित्य खरेदी करण्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती. बाजारपेठेत उत्सवाची रंगत आणि भक्तांची श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. तर यंदा बाजारात मागणी चांगली असल्याने वस्तूंच्या किंमतीही वधारल्याचे चित्र होते. गणेश मूर्ती समोर सजावटीची कापड आणि प्लॅस्टिकची फुले गेल्यावर्षी ६० रुपये डझन भावाने मिळत होती. यंदा त्याचे दर ८० रुपयांपर्यंत असल्याचे दादर बाजारातील विक्रेत्या कोमल बोंद्रे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पाऊस असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली होती. रविवारी झालेल्या गर्दीने पावसाने वाया गेलेल्या दिवसांची कसर भरून निघाली, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
पुढील दोन दिवस कामकाजाचे असल्याने अनेकांनी रविवारीच गणेशाच्या मूर्तींची नोंदणी करून ठेवली. त्यामुळे मूर्तीकरांच्या कारखान्यात आणि दुकानांमध्ये गर्दी होती. यंदा पर्यावरण पूरक गणेश मूर्तींच्या खरेदीसाठीही अनेकांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.
पूजेचे साहित्य आणि तोरणांची खरेदीगणेशाच्या पूजेचे साहित्य खरेदीही गृहिणींकडून सुरू होती. नारळ, पूजेचे सामान यांची खरेदी केली जात होती. तर मंडळ आणि घरातील गणपती यांच्या समोर आकर्षक रोषणाई करता यावी, यासाठी विद्युत दिव्यांच्या माळांची खरेदीची लगबग तरुण वर्गाकडून सुरू असल्याचे चित्र दिसत होते.कोकणातील घरी येत्या एक-दोन दिवसांत जाण्याचे बेत असलेल्या कोकणवासीयांनीही खरेदीसाठी गर्दी केली होती. गावच्या घरातील गणेशाच्या सजावटीसाठी मुंबईतील बाजारातूनच साहित्य खरेदीकडे अनेकांचा कल होता.
नवी मुंबईसह ठाण्यातील बाजारपेठांमध्ये गर्दीगणेशोत्सवानिमित्त आवश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी ठाणे नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. ठाण्यातील स्टेशन रोड, राममारुती रोड, घोडबंदर रोड, वर्तकनगर, पांचपाखाडी आदी परिसरातील बाजारपेठांत मोठी गर्दी होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण बाप्पांच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करत होता.नवी मुंबईमधील सण, उत्सवातील साहित्य खरेदीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ मुंबई कृषी उत्तन्न बाजार समितीच्या परिसरात आहे. येथील माथाडी भवन, नवी मुंबई मर्चंट चेंबर आणि आसपासच्या परिसरातील दुकानांमध्ये गणेशोत्सव सजावटीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांना वेळेत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दुकानदारांना जादा कर्मचारी तैनात करावे लागले होते.