Join us

मुंबईतील लॉकडाऊनला दुकानदार अन् उद्योजकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 19:17 IST

लॉकडाऊनपेक्षा संसर्ग रोखण्यासाठीच्या निर्देशांचे पालन करायला लावा 

मीरारोड - मुंबईत लॉक डाऊन शिथिल केल्याने मीरा भाईंदर मधून नागरिक कामा साठी रोज जात असताना शहरात मात्र लॉक डाऊन वाढवल्याने दुकानदार, उद्योजकांसह रोजंदारीवर पोट असणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे . लॉकडाऊन पेक्षा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जे काही निर्देश आहे त्याची काटेकोर अमलबजावणी करायला लावा असे या लोकांचे म्हणणे आहे . 

महापालिकेने आधी 1 ते 10 जुलै पर्यंत लॉक डाऊन लागू केला होता. महापौर , आयुक्त व अन्य पक्षाच्या बैठकीत लॉक डाऊन वाढवू नये असा निर्णय झाला असताना अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवला म्हणून 10 रोजीच्या रात्री मीरा भाईंदर मध्ये देखील लॉक डाऊन 18 जुलै पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान कोरोना चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाण देखील वाढल्याचे आकडे समोर आले . या वरून नागरिकां मध्ये देखील लॉक डाऊन करून कोरोना रुग्ण वाढत असतील तर उपयोग काय ? असा प्रश्न केला जात आहे . तर दुसरीकडे लॉक डाऊन मुळे रोजंदारीवर उपजीविका चालवणाऱ्यांसह दुकानदार व उद्योजक देखील आर्थिक दृष्ट्या आणखीन अडचणीत सापडले आहेत . 

मीरा भाईंदर मध्ये स्टील उद्योग तसेच लहान सहन कारखाने मोठ्या संख्येने आहेत . लॉक डाऊन मुळे कारखाने गेले तीन महिने बंद असल्याने आता कुठे कारखाने हळूहळू सुरु होत असताना पुन्हा लॉक डाऊन वाढवल्याने उद्योग व्यवसाय व त्यातून मिळणारा रोजगार मोडीत निघेल असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे दीपक शाह म्हणाले. लॉक डाऊन जाहीर केला तरी खुलेआम भाज्या आदी विक्री तसेच लॉक डाऊनचे उल्लंघन सुरूच आहे . त्यामूळे लॉक डाऊन पेक्षा नागरिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जे काही निर्देश आहेत त्याचे काटेकोर पालन करायला लावा असे दुकानदार अनुप सातोस्कर म्हणाले . 

लॉकडाउनचा राजकारणी, अधिकारी, बिल्डर , मोठे व्यापारी आदींना फरक पडत नाही पण रोज मेहनत करून पोट भरणाऱ्या आणि लहान सहान नोकरी - व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर मात्र उपाशी मरायची पाळी आली आहे असा संताप चपला दुरुस्ती आदी गटई काम करणाऱ्या अमृत डोंगरे यांनी बोलून दाखवला.  

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या