शूजची लाँड्री आॅनलाइन!
By Admin | Updated: June 7, 2015 02:13 IST2015-06-07T02:13:23+5:302015-06-07T02:13:23+5:30
बुटांची दुरुस्ती करणे, बूट धुऊन देणे, त्यांचा रंग सुधारणे किंवा मग बुटांचे नूतनीकरण करण्याचा हटके व्यवसाय कोणी करत असेल तर..?

शूजची लाँड्री आॅनलाइन!
बुटांची दुरुस्ती करणे, बूट धुऊन देणे, त्यांचा रंग सुधारणे किंवा मग बुटांचे नूतनीकरण करण्याचा हटके व्यवसाय कोणी करत असेल तर..? विश्वास बसत नाही ना...? पण अशा प्रकारची आॅनलाइन शू लाँड्री एका मुंबईकर तरुणाने सुरू केली आहे; आणि अवघ्या काही वर्षांतच संदीप गजाकसच्या या व्यवसायाचा विस्तार झाला असून, सेलिब्रेटींनाही याची भुरळ पडली आहे.
अगदी चाकोरीबाहेरचा असला तरी संदीपचा हा व्यवसाय अगदी साधा आणि सोपा आहे. कोणाचे शूज् धुऊन आणि साफ करून एखादा फायदेशीर व्यवसाय उभा करता येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र तरीही स्वत:च्या सेव्हिंग्जमधून काही पैसे जमा करून संदीपने भारतातील पहिली ‘शू लाँड्री’ सुरू केली. मिठीबाई कॉलेजात शिकत असताना संदीपला प्रथम शू लाँड्रीची कल्पना आली. संदीपच्या कॉलेजमधील श्रीमंत घरातील मुले त्यांच्या बुटांविषयी अतिशय बेफिकीर होती. एकदा वापरून झाल्यानंतर जरा खराब झालेले बूट ते फेकून देत असत. तेव्हा संदीपने एका मित्राबरोबर लावलेल्या पैजेमधून या कल्पनेचा उदय झाला. संदीपने केवळ पैजेसाठी त्याच्या मित्राचे बूट अगदी नव्यासारखे चांगले करून आणले. इतके चांगले की त्याच्या मित्राला ते त्याचेच शूज् आहेत यावर विश्वासच बसला नाही. परंतु, या व्यवसायासाठी घरच्या मंडळीकडून पाठिंबा मिळवण्यास तारेवरची कसरत करायला लागल्याचे संदीपने सांगितले.
संदीपच्या या लाँड्रीत बूट धुण्याच्या आॅडर्स घेणे, दुरस्ती करणे, त्यांची डागडुजी करणे, रंगांच्या दर्जात सुधारणा करणे आणि बुटांच्या संपूर्णत: नूतनीकरणाची प्रक्रिया केली जाते. गेल्या १२ वर्षांत ८० ते ९० हजार बुटांवर मी स्वत: क्लिनिंग, वॉशिंग आणि रिस्टोरेशन केल्याचे संदीप आवर्जून सांगतो. त्यामुळे या प्रक्रियेत रोज नवनवीन संशोधन करण्याचा प्रयत्न सुरू असतो. शिवाय, लॉँड्रीचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्टीचिंग केले जात नाही. तसेच, कोणत्याही प्रक्रियेसाठी परदेशी उपकरणेही वापरली जात नाहीत. संदीपने त्याच्या डिलिव्हरी बॉयला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगितले आहे, ते म्हणजे नवीन दिसणारे बूट पाहून ग्राहकाच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य! कोणत्याही उद्योगात ग्राहकाच्या चेहऱ्यावरचे समाधान महत्त्वाचे तेच लाँड्रीचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे संदीप सांगतो.
मिठीबाई कॉलेजात शिकत असताना संदीपला प्रथम शू लाँड्रीची कल्पना आली. संदीपच्या कॉलेजमधील श्रीमंत घरातील मुले त्यांच्या बुटांविषयी अतिशय बेफिकीर होती. एकदा वापरून झाल्यानंतर जरा खराब झालेले बूट ते फेकून देत असत. तेव्हा संदीपने एका मित्राबरोबर लावलेल्या पैजेमधून या कल्पनेचा उदय झाला. संदीपने केवळ पैजेसाठी त्याच्या मित्राचे बूट अगदी नव्यासारखे चांगले करून आणले. इतके चांगले की त्याच्या मित्राला ते त्याचेच शूज् आहेत यावर विश्वासच बसला नाही. परंतु, या व्यवसायासाठी घरच्या मंडळीकडून पाठिंबा मिळवण्यास तारेवरची कसरत करायला लागल्याचे संदीपने सांगितले.
संदीपचे सारे शिक्षण बोर्डींग स्कूलमध्ये झाले. आर्मीचे आकर्षण असलेला संदीप एनसीसीत दाखल झाला. कॅडेट म्हणून प्रशिक्षण घेत असताना आपले बूट, कपडे स्वच्छ ठेवायचे संस्कार त्याच्या मनावर बिंबवले गेले होतेच.
फायर इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याला नोकरीच्या चाकोरीबद्घ जीवनात अडकायचे नव्हते. करिअर निवडण्याची वेळ आली तेव्हा एनसीसीतले शिस्तीचे संस्कार त्याच्या कामी आले व उभी राहिली ही आगळीवेगळी शू लाँड्री.
प्रथमदर्शनी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात पायातल्या बुटांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे या बुटांच्या देखभालीच्या व्यवसायाची भन्नाट कल्पना त्याला सुचली...
- स्नेहा मोरे