अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
By गौरी टेंबकर | Updated: October 30, 2025 06:28 IST2025-10-30T06:17:23+5:302025-10-30T06:28:14+5:30
ओशिवरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : दिवाळीच्या साफसफाईसाठी ऑनलाईन मोलकरीण मागविणे एका इव्हेंट प्लॅनर महिलेला चांगलेच महागात पडले. त्यांच्या घराची साफसफाई झाली नाहीच, उलट त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १.८६ लाख रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
तक्रारदार ऐश गुलाटी (वय ३५) या इव्हेंट प्लॅनर असून, त्या जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड परिसरातील एका इमारतीत राहतात. १५ ऑक्टोबरला दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्यासाठी त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास ‘अर्बन कंपनी मेड सर्विस’ असे गुगलवर सर्च केले. त्यावर मिळालेल्या एका साईटवरील मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला.
सिम कार्ड बंद झाले...
त्या व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल करून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले होते. गुलाटी यांना त्या ॲपचे नाव व मोबाईल क्रमांक आठवत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. २३ ऑक्टोबरला त्यांचे सिम कार्ड अचानक बंद झाले.
त्यांनी ते संबंधित गॅलरीत जाऊन पुन्हा सुरू करून घेतले. मात्र, त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ८६ हजार ८८८ इतकी रक्कम काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गुलाटी यांनी सायबर सेल, तसेच ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.