शिवसेनेचा पदाधिकारी हाफीज बलोचची आत्महत्या
By Admin | Updated: April 25, 2015 22:35 IST2015-04-25T22:35:23+5:302015-04-25T22:35:23+5:30
येथील शिवसेनेचा पदाधिकारी हाफीज बलोच (४५), रा. होली कॉम्प्लेक्स, भार्इंदर (पू.) याने घरी आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उजेडात आला आहे.

शिवसेनेचा पदाधिकारी हाफीज बलोचची आत्महत्या
भार्इंदर : येथील शिवसेनेचा पदाधिकारी हाफीज बलोच (४५), रा. होली कॉम्प्लेक्स, भार्इंदर (पू.) याने घरी आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उजेडात आला आहे. या वेळी बलोच याने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्यावरील ७० लाखांचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यानेच आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
बलोच सुरुवातीला शिवसेनेचा मीरा रोड येथील शहरप्रमुख होता. त्यानंतर, २०१२ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून पालिकेची निवडणूक लढविली होती. त्यात पराभूत झाल्यानंतर कालांतराने त्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत जाण्याचा प्रयत्न केला होता. अखेर, पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून तेथेच स्थिरावला होता. शिवसेनेतील वरिष्ठांशी त्याचे चांगले संबंध होते. दरम्यानच्या काळात बलोचवर खंडणी, हाणामाऱ्या असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते.
त्याने मीरा रोडच्या नयानगरमध्ये सेंट अॅन्थोनी नामक शाळा सुरू केली होती. आतापर्यंत त्याच्या डोक्यावर ७० लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. या कर्जाची परतफेड करण्यास तो असमर्थ ठरू लागल्याने तो मानसिक तणावाखाली वावरत होता. त्याचे कुटुंब औरंगाबाद येथे गेल्यानंतर शनिवारी त्याच्या पत्नीने त्याला मोबाइलवरून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो प्रतिसाद देत नसल्याने तिने त्याच्या मित्राला घरी पाठविले होते. त्याने दार उघडल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)
उर्दू भाषेतल्या चिठ्ठीने केला खुलासा
सुनीलने बनावट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला असता बलोचने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सुनीलने त्याची माहिती नवघर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बलोचच्या घराची झाडाझडती घेतली असता उर्दू भाषेत लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यात त्याने आपल्यावरील कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यानेच आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांत नोंद करण्यात आली असून उत्तरीय तपासणीसाठी टेंबा शवविच्छेदन केंद्रात पाठविला आहे.