आयुक्तांच्या ठाम भूमिकेपुढे शिवसेनेने टेकले गुडघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:44 IST2017-12-09T02:43:47+5:302017-12-09T02:44:01+5:30
महापौर व गटनेत्यांना अंधारात ठेवून महापालिकेच्या मोबाइल अॅपचे उद्घाटन परस्पर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने, पालिका महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी हंगामा केला

आयुक्तांच्या ठाम भूमिकेपुढे शिवसेनेने टेकले गुडघे
मुंबई : महापौर व गटनेत्यांना अंधारात ठेवून महापालिकेच्या मोबाइल अॅपचे उद्घाटन परस्पर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने, पालिका महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी हंगामा केला. सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या मानापमान नाट्यात आयुक्तांना झुकविण्याचा निर्धार शिवसेना नगरसेवकांनी केला होता. मात्र, आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे महासभेतील वातावरण तापले असतानाच, ऐन वेळी महापौर आणि सभागृह नेत्यांनी यू टर्न घेत, या वादावर पडदा टाकला. स्वपक्षीय नेत्यांनी आपल्याच निवेदनातील अशी हवा काढल्याने, शिवसेना नगरसेवकांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे.
मुंबईच्या विकास नियोजन आराखड्यावर महापालिकेने तयार केलेले अॅप व नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी झाले. मात्र, याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर व गटनेत्यांना कोणतीच खबर नव्हती. हा पालिका सभागृहाचा आणि मुंबईच्या प्रथम नागरिकाचा अपमान असल्याने, पालिका आयुक्तांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केली. भाजपा वगळता सर्व पक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरला. सत्ताधारी शिवसेनेचा प्रशासनावर अंकुश नाही. आयुक्तांविरोधात शिवसेनेने अविश्वास ठराव आणावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असे आवाहन विरोधकांनी केले.
मात्र, पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सभागृह आणि लोकप्रतिनिधींच्या अधिकारांची मला जाणीव आहे. विकास नियोजन आराखड्यावरील बैठकीत मुख्यमंत्र्यानी या अॅपचे त्वरित लोकार्पण करावे, असे सुचविल्याने हे उद्घाटन झाले. यात सभागृहाचा कोणताही अपमान झालेला नाही, अशी ठाम भूमिका घेतली. तरीही त्यांच्या विनंतीनुसार सभागृह नेते यशवंत जाधव यांनी आयुक्तांचे निषेध करणारे निवेदन मागे घेत, विरोधकांसह स्वपक्षीय नगरसेवकांनाही बुचकळ्यात टाकले.
शिवसेना नगरसेविकांचा
आयुक्तांना घेराव
पालिका सभागृहात आयुक्तांविरोधात चर्चा सुरू असताना त्यांनी हजर राहावे, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. मात्र, आयुक्त एका बैठकीत व्यस्त असल्याने सभागृहात आले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविकांनी आयुक्तांच्या दालनावर हल्लाबोल केला. अखेर आयुक्तांना आपली
बैठक बाजूला सारून सभागृहात यावे लागले.
आयुक्तांच्या ठाम भूमिकेने
शिवसेनेची कोंडी
नगरसेवकांच्या आरोपांचा सामना करताना, आपल्या भूमिकेवर ठाम राहात महापौर आणि सभागृहाचा अपमान झालेला नाही, असे ठणकावून सांगितले. पालिकेने बनविलेला विकास आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक होती. या बैठकीत डिजिटल अॅपची माहिती दिली असता, मुख्यमंत्र्यांनी अॅपचे त्वरित लोकार्पण करावे, असे सांगितल्याची माहिती आयुक्तांनी दिली. ३४ वर्षे आपण सनदी अधिकारी असून, सभागृह व लोकप्रतिनिधींच्या अधिकारांची जाणीव असल्याचा टोलाच त्यांनी या वेळी लगावला.
नगरसेवक नेत्यांवर चरफडत सभागृहाबाहेर पडले
महापौरांचे अपमान नाट्य दीड तास महासभेत रंगल्यानंतर, शिवसेना नेत्यांनी अशी माघार घेतल्याने, विरोधकच नव्हे, तर स्वपक्षीय नगरसेवकही खवळले. ऐन वेळी नेत्यांनी माघार का घेतली? हे कोडे शिवसेना नगरसेवकांना सुटले नाही. त्यामुळे काही नाराज नगरसेवक आपल्याच नेत्यांवर चरफडत सभागृहाबाहेर पडले.
अपमाननाट्याचा फुगा फुटला...
निषेध करणारे निवेदन मागे घेण्याचे आवाहन सभागृह नेत्यांना केले, तसे लगेच महापौरांनी यापुढे अशा घटना घडू नये याची दाखल घ्यावी, असे निर्देश आयुक्तांना देत, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी तुम्ही माफी मागितली नाही, तरी आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला माफ केले, असे जाहीर करीत नांगी टाकली.