शिवसेनेला हवी ‘मलईदार’ महामंडळे!
By Admin | Updated: June 5, 2015 01:41 IST2015-06-05T01:41:41+5:302015-06-05T01:41:41+5:30
राज्याच्या सत्तेतील मिळालेल्या वाट्यावर फारशा समाधानी नसलेल्या शिवसेनेने म्हाडा, एसटी अशी ‘मलईदार’ महामंडळे आपल्याला मिळावी, असा दावा केला आहे.

शिवसेनेला हवी ‘मलईदार’ महामंडळे!
मुंबई : राज्याच्या सत्तेतील मिळालेल्या वाट्यावर फारशा समाधानी नसलेल्या शिवसेनेने म्हाडा, एसटी अशी ‘मलईदार’ महामंडळे आपल्याला मिळावी, असा दावा केला आहे. त्यामुळे महामंडळांच्या वाटपावरून भाजपा-शिवसेनेत तणातणी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन शिवसेनेला हव्या असलेल्या महामंडळांची, समित्यांची यादी सादर केली. नंतर रात्री या तीन नेत्यांची शिवालयात महामंडळांच्या वाटपाबाबत बैठकही झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदेशात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस मुंबईबाहेर असल्याने आता याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.
सत्तेत सहभागी होताना दुय्यम दर्जाची खाती दिली गेली. त्यामुळे महामंडळाचे वाटप करताना हा अन्याय दूर केला जावा, अशी शिवसेना नेत्यांची अपेक्षा आहे. याबाबत शिवसेनेतील एका नेत्याने सांगितले की, महामंडळ, समित्या येथपासून विशेष कार्यकारी अधिकारी पदापर्यंत सर्व निर्णय एकाचवेळी व्हावे, ही शिवसेनेची अपेक्षा आहे. भाजपा सत्तेतील मोठा भाऊ असल्याने त्यांना ६० टक्के तर शिवसेनेला ४० टक्के, दोन महामंडळांमागे एक शिवसेनेला असे वेगवेगळे फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत. त्यावर निर्णय झाल्यावर मग कुठली महामंडळे कुणाकडे त्यावर निर्णय होईल. (विशेष प्रतिनिधी)